Saturday , September 21 2024
Breaking News

कर्नाटक प्रमाणे शिंदे-फडणवीस सरकारलाही मुळासकट बाजूला करा

Spread the love

 

सिद्धरामय्यांचा सांगलीतून हल्लाबोल

सांगली : महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीसांचे भ्रष्ट सरकार उखडून टाका, काँग्रेसची सत्ता आणा असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलं आहे. सांगली येथील कल्पद्रुम क्रीडांगण मैदानावर काँग्रेसने महानिर्धार 2024 शेतकरी संवाद आणि कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात सिद्धरामय्या बोलत होते. यावेळी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, भारतीय जनता पक्ष जाती-जातीत, धर्मा-धर्मात वाद घडवून सामाजिक शांतता भंग करत आहे, तसेच संघ परिवाराचे लोकही धर्मा-धर्मात वाद लावून दंगे घडवतात आणि त्यात सामान्य जनता मात्र भरडली जात आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हणजे भाजपा असे समीकरण आहे.

कर्नाटकात 40 टक्के कमिशन दिल्याशिवाय कोणतेच काम होत नव्हते. कर्नाटकच्या जनतेने भ्रष्टाचारी भाजपाला घरी बसवले, महाराष्ट्रातही शिंदे-फडणवीस सरकार अत्यंत भ्रष्ट आहे, हे भ्रष्ट सरकारही उखडून टाका व काँग्रेसची सत्ता आणा, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.

‘संविधानासाठी बलिदान देण्याची तयारी ठेवा’
ते म्हणाले की, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहु महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिशा दिली. डॉ. बाबासाहेबांचे संविधान नसते तर दिनदलित, शोषित, वंचित वर्ग मुख्य प्रवाहात आला नसता, त्याला समान हक्क मिळाले नसते. जातीयवादी भाजपा सरकार मात्र घटनाच बदलण्याची भाषा करत आहे. गोलवलकर, सावरकर यांनी संविधान अस्तित्वात आल्यापासूनच विरोध केला आहे आणि आताही या विचाराचे लोक संविधानाला विरोधच करत आहेत. संविधान राहिले तरच आपले अस्तित्व राहिल म्हणून संविधानाच्या रक्षणासाठी कोणताही त्याग व बलिदान देण्याची तयारी ठेवा, असे देखील सिद्धरामय्या म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने 224 पैकी 136 जागांवर विजयी मिळवला. कर्नाटकात भाजपा जनतेच्या आशिर्वादाने सत्तेत येत नाही, ते ऑपरेशन कमळ करुन आमदार विकत घेऊन सत्तेत आले होते. कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवून भाजपा सत्ता स्थापन करते. काँग्रेसने कर्नाटकात भाजपाचा भ्रष्टाचार घराघरात पोहचवला व भाजपामुक्त कर्नाटक केले. सरकार स्थापन होताच जनतेल्या दिलेल्या 5 आश्वासनांवर 24 तासात निर्णय घेतला.

About Belgaum Varta

Check Also

शिल्पकार जयदीप आपटेच्या पोलीस कोठडीत वाढ

Spread the love  सिंधुदुर्ग : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कोसळल्या प्रकरणी बांधकाम विभागाच्यावतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *