सोशल मीडियावर हास्याचे फवारे; मिम्स, पोस्ट, व्यंग्यचित्रांचा पाऊस !
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी (ता. २) पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीमध्येही उभी फूट पडली. राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी राज्यसरकारमध्ये सामील होत त्यांच्यापैकी नऊ आमदारांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतली. या साऱ्या राजकीय घटनाक्रमाचे पडसाद कर्नाटक सीमा भागात उमटले. सोशल मीडियावर मिम्स, व्यंगचित्रे, भन्नाट पोस्ट यांचा अक्षरश: पाऊस पडला. सोशल मीडियावर मिम्स, पोस्ट, व्हिडिओ, ट्विट शेअर करत लोकांनी राजकीय परिस्थितीवर आपल्या भावनांना वाट करून दिली. दुपारनंतर सक्रिय झालेला हा सिलसिला रात्री उशिरापर्यंत चालूच होता यातील काही राजकारणावर भाष्य करत हसविणाऱ्या तर काही नेत्यांना व मतदारांना आत्मचिंतन करायला लावणाऱ्या होत्या.
व्हाट्सअप ग्रुप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यावर भन्नाट पोस्ट आणि व्यंगचित्र यांच्या माध्यमातून राजकारणाचे पडसाद उमटले. मागील पहाटेच्या वेळी झालेला शपथविधी आज पुन्हा दुपारी झाल्याने…. ‘पहाटेच्या झोप मोडनंतर रविवारची दुपारची झोप वाया कारणीभूत फक्त दादा’. या पोस्टने मागील आठवणींना उजाळा दिला. तर काहींनी निवडणूक आयोगाला विनंती केली की पुढच्या निवडणुकीपासून आमच्या बोटाला शाई ऐवजी चुना लावण्यात यावा, असे सांगत खेद व्यक्त केला.
काहींनी या राजकारणावर भाष्य करताना म्हटले की, पवार साहेबांनी नुसती भाकरी फिरवली होती… दादांनी तर तवा पालथा करून चुलीत पाणी ओतले आणि पिठाचा डब्बाच पळवला. तर काहींनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची आठवण करून देत त्यांच्या तोंडी ‘मी आता राज्यपाल नाही… माझं नाव घ्याल तर टकुन्यात दगड घालीन… आणि मुख्यमंत्र्यांच्या मनातील भावना अशा व्यक्त करत मनोरंजन केले. ‘सासूमुळे वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली’ अशी वाक्ये टाकत मनमुराद हसवले. काहींनी ब्रेकिंग बातमी म्हणत आता विरोधी पक्ष म्हणून फक्त जनता शिल्लक अशी पोस्ट टाकली.
‘ती पहाट’विसरून… आता ही दुपार कायमची आठवणीत राहील अख्ख्या महाराष्ट्राला.. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची तक्रार आम्हाला डायरेक्ट राजभवनात ! ना डोंगर, ना झाडी, ना हाटील.. कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचा ‘कार्यकर्ते टेन्शनमध्ये’ या व्हिडिओने तर जनतेची चांगलीच करमणूक केली. तर काहींनी मतदारांची भूमिका आता काय आणि कशी ठेवायची यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
वर्षभर महाराष्ट्राने ऐकलंय.. ‘माझा बाप चोरला…’ आता यापुढे हेही ऐकायचंय… ‘माझा पुतण्या चोरला…’ अशा ओळींनी स्मित फुलवले. किरीट सोमय्या, अण्णा हजारे अशा अनेकांवर केलेल्या राजकीय पोस्ट फिरतच राहिल्या. अर्थात रविवारचा दिवस हा महाराष्ट्रातील राजकारणातील आठवणींचा दिवस राहिला. पार, कट्टे, हॉटल अशा अनेक ठिकाणी गप्पांचा विषयही राजकारणाचाच पाहायला आणि ऐकायला मिळाला.
——————————————————————
सोयाबीन काढून ऊस
‘कोणी कोणत्याही पक्षात गेले तरी आपणाला सोयाबीन काढून ऊसाची लावण करायची आहे. हे लक्षात ठेवा. आपला पक्ष… फक्त शेतीकडे लक्ष!’ अशा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बाबतही पोस्ट व्हायरल झाल्या.