मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. अजित पवार यांनी भाजप आणि शिंदे गटाच्या साथीनं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांची साथ मिळाल्यामुळे नक्की भाजपची ताकद वाढली आहे. पण दुसरीकडे आधीपासूनच भाजपसोबत असलेला आणि शिवसेनेतून बंड करुन बाहेर पडलेला शिंदे गट मात्र नाराज असल्याच्या चर्चा आहेत. तशी नाराजी शिंदेंच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी शिंदेंकडे व्यक्त केल्याचीही माहिती मिळत आहे.
अजित पवारांच्या शपथविधीनंतर काल (सोमवार) शिंदे गटाची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी पार पडली. याच बैठकीत शिंदेंच्या मंत्री आणि आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुनही शिंदे गटातील काही मंत्री नाराज आहेत.
शिंदे गटातील सर्व मंत्र्यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कॅबिनेट मंत्र्यांसह उदय सामंत, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, शिंदे गटाचे नेते दादा भुसे, संदिपान भुमरे उपस्थित होते. प्रत्येकाची मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी एक छोटीशी बैठक झाली ज्यात त्यांनी विभागांच्या संभाव्य वाटपावर चर्चा केली. यासोबतच अजित पवार आणि त्यांच्या निष्ठावंतांना सरकारमध्ये सामावून घेण्याच्या निर्णयावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ आमदार राज्य मंत्रिमंडळात सामील झाले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीची भावना निर्माण झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्री, आमदार आणि खासदारांनी आपल्या मनातली खदखद एकनाथ शिंदेंसमोर बोलून दाखवली. अजितदादा आणि राष्ट्रवादीचे आमदार राज्य सरकारमध्ये आल्यानं जुने वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करून मार्ग काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिल्याचे समजते आहे.