मुंबई : अजित पवारांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात क्षणाक्षणाला वेगवेगळ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. दरम्यान शिंदे गटात मंत्रीपदावरून दोन गट निर्माण झाल्याची चर्चा आहे. एवढेच नाही तर दोन आमदार मंत्रीपदावरून भिडल्याची देखील माहिती समोर येत आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना भाजपमध्ये देखील सर्व काही आलबेल नसल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार तथा प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी केला आहे. सत्तेची पदं गेल्याने फक्त शिंदे गटातच नाराजी नसून भाजपमध्ये देखील थोडीफार नाराजी आहे, असं शिरसाट म्हणाले आहेत. शिरसाट यांच्या या दाव्यामुळे अजित पवारांची सत्तेत झालेली एन्ट्री भाजपच्या देखील काही लोकांना पटली नसल्याची आता चर्चा होत आहे.
भाजपमध्येही नाराजी?
मंत्रीपदासाठी इच्छुक असलेल्या शिंदे गटातील अनेक आमदारांनी यापूर्वीच उघडपणे बोलून दाखवले आहेत. तर भाजपमध्ये देखील काही इच्छुक आहेत. मात्र आजपर्यंत भाजपच्या आमदारांकडून उघडपणे यावर भाष्य करण्यात आले नाही. तर अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे भाजपमधील इच्छुकांची देखील धाकधूक वाढली असावी. पण आतापर्यंत भाजपमधील नाराजीची कधीच उघडपणे चर्चा झाली नाही. मात्र भाजपमध्ये देखील नाराजी असल्याचे वक्तव्य शिरसाट यांनी केल्याने, भाजप आमदारांच्या नाराजीची चर्चा होऊ लागली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta