
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभेसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या उमदेवार यादीत 8 जणांचा समावेश आहे. मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हातकणंगल्यातून धैर्यशील माने यांच्यासह आठ ठिकाणचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ठाणे आणि नाशिकमधील उमेदवार अद्याप घोषित करण्यात आले नाहीत. ठाण्यावर भाजपने तर नाशिकवर राष्ट्रवादीने दावा केल्याची माहिती आहे.
याआधी भाजप, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि अजित पवार यांनी आपले उमदेवार जाहीर केले आहेत. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत.
मुंबई दक्षिण मध्य – राहुल शेवाळे
कोल्हापूर – संजय मंडलिक
शिर्डी – सदाशिव लोखंडे
बुलढाणा – प्रतापराव जाधव
हिंगोली – हेमंत पाटील
मावळ – श्रीरंग बारणे
रामटेक – राजू पारवे
हातकणंगले – धैर्यशील माने
ठाणे आणि नाशिकध्ये सस्पेन्स कायम
शिवसेनेच्या आठ उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये नाशिक आणि ठाण्याच्या उमेदवारी मात्र जाहीर करण्यात आली नाही. नाशिकच्या हेमंत गोडसेंच्या नावाला भाजपचा विरोध आहे, त्याचवेळी राष्ट्रवादीने त्या जागेवर दावा केला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या घरच्या ठाण्याच्या जागेवरच भाजपने दावा केला आहे. ही जागा आपल्यालाच मिळावी म्हणून भाजप आग्रही आहे. तर ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने शिंदेही ती जागा सोडण्यास तयार नाहीत.
कल्याण आणि वाशिमचा उमेदवारही घोषित नाही
कल्याणमधून एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील हे नक्की असलं तरी त्यांचं नाव पहिल्या यादीत नाही. तर दुसरीकडे यवतमाळ वाशिमच्या जागेवरून तिढा निर्माण झाला आहे. वाशिमच्या पाच वेळच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांच्या नावाला भाजपचा विरोध असल्याची माहिती आहे. तर संजय राठोड यांना उमेदवारी द्यावी असा भाजपचा आग्रह आहे. यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
Belgaum Varta Belgaum Varta