मारकडवाडी : ईव्हीएमवरून देशातील जनतेची दिशाभूल करू नका, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना काही आकडे दाखवले होते. त्यावरून आता शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये तुम्ही राजकारण करू नका, लोकांना भेटणं यात चुकीचं काय आहे, असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला.
मारकडवाडी येथे शरद पवार यांनी आज भेट दिली. शरद पवार यांनी मारकडवाडी येथील नागरिकांची भेट घेऊन तुमचा मुद्दा आम्ही देशभरात घेऊन जाऊ, असे अश्वासन दिले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. शरद पवार म्हणाले की, “काल मुख्यमंत्री म्हटले पवार साहेबांनी हे करणं चुकीचं आहे. यात काय चुकीचं आहे, तुम्हाला भेटणं चुकीचं आहे? आवाज उठवणं चुकीचं आहे? माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, यात राजकारण आणू नका. आम्हाला याचं राजकारण करायचं नाही. लोकांच्या मनात शंका आहे. तो संशय दूर करायचा आहे. लोकशाही कशासाठी आहे. लोकांचे अधिकार काय आहे. हे अधिकार जतन करण्यासाटी अडचण येत असेल तर लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला पाहिजे”
गावानं ठरवलं वेगळ्या दिशेनं जायचं, त्यावर तुमच्यावर खटला भरला. तुम्हाला तुमच्यात गावात जमावबंदी केली. या सर्वाचं रेकॅार्ड द्या. जमावबंदी, तुमच्यावर दाखल केलेले गुन्हे. याचं रेकॉर्ड द्या. आम्ही ते देशभरात नेऊ, निवडणूक आयोगाकडे आम्ही देऊ, पंतप्रधानांकडे देऊ, असे अश्वासन शरद पवार यांनी मारकडवाडी येथील ग्रामस्थांना दिले. अनेक देशांनी ईव्हीएमचा त्याग केला. आज जगातला सर्वात मोठा देश असलेल्या अमेरिकामध्ये ईव्हीएम वापरले जात नाही. युरोप खंडातील सर्व देश ईव्हीएम वापरत नाहीत, असेही शरद पवार यांनी सांगितले.