सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. साताऱ्यामध्ये यंदाचे ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. पुण्यामध्ये आज महामंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अध्यक्षपदाबाबतचा मोठा निर्णय घेण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा येथे होणार्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या निवडणुकीत हा निर्णय घेण्यात आला. शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असलेले आगामी साहित्य संमेलन एकेकाळची मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातारा येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड होण्याचा अनोखा योगायोग यानिमित्ताने जुळून आला आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेत महामंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीला महामंडळाच्या चारही घटक संस्थांसह संलग्न आणि समाविष्ट संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या संस्थांनी अध्यक्षपदासाठी सुचवलेल्या नावांवर या बैठकीत चर्चा झाली. विश्वास पाटील यांच्या नावाला बहुतांश सदस्यांनी सहमती दर्शवल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta