कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वांचीच आग्रहाची मागणी आहे. समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही सर्वांचीच भूमिका आहे. त्याआधी समाजाला ज्या सुविधा मिळायला हव्यात त्याबाबत चर्चा करण्यासाठी संभाजीराजे तुम्ही मुंबईला या, मी तुमची भेट मुख्यमंत्र्यांशी घालून देतो. चर्चेने प्रश्न सोडवू, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी केले. ते मराठा मूक आंदोलनात भूमिका मांडत होते.
‘संभाजीराजे यांनी मांडलेल्या मागण्यांसाठी राज्य सरकार १०० टक्के सकारात्मक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या सर्वांना आपल्याशी चर्चा करायची आहे. यासंबंधी चर्चा करायची आहे. सरकारने एक पाऊल पुढे टाकून सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्य शासन स्तरावरील विषयांवर चर्चा करण्यासाठी आपण उद्याच मुंबईला यावे, मुख्यमंत्री चर्चा करण्यासाठी तयार आहेत.’, असे सतेज पाटील यांनी यावेळी सांगितले.
