खानापूर : कापोली, शिवठाण ते कोडगई रस्त्याची लवकरच डागडुजी करण्यात येईल तर पावसाळ्यानंतर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात येईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य उप कार्यकारी अभियंता बसवराज हलगी यांनी दिले आहे.
कापोली ते कोडगई रस्त्याची गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे दुरावस्था झाली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने शिवठाण येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात युवा समितीच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला तसेच काही वेळ रस्ताही बंद केला त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ खोळंबली होतो. याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य उपकार्यकारी अभियंता बसवराज हलगी व जीवन वारकरी यांनी आंदोलकांची भेट घेऊन रस्ता नादुरूस्त झाला असून आपल्याला याची कल्पना असून याबाबत आपण आराखडा बनवला आहे, तसेच पावसाळ्यात काम करण्यास अडचण येणार असल्याने पावसाळ्यानंतर रस्त्याच्या कामासाठी अनुदान मंजूर करून काम हाती घेतले जाईल तसेच सध्या नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी तातडीने डागडुजी करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले व बैलूर, देवाचीहट्टी ते तोराळी या रस्त्याची सुध्दा दुर्दशा झाली असून त्या रस्त्याचे चित्रीकरण, छायाचित्रे हलगी यांच्या निदर्शनास आणण्यात आली. सदर रस्त्याची पावसाळ्यापूर्वी डागडुजी व पावसाळ्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी युवा समितीच्यावतीने हलगी यांना निवेदनही देण्यात आले.
यावेळी युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी खानापूर तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून याबाबत लवकरच व्यापक कार्यक्रम हाती घेतला जाणार असून तालुक्यातील नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम वेळेत करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
आंदोलनावेळी संभाजी देसाई, सचिव सदानंद पाटील, नागरगाळी ग्राम पंचायत अध्यक्ष बालकृष्ण नाईक, घोटगाळी ग्राम पंचायत अध्यक्ष संतोष मिराशी, कापोली ग्राम पंचायत अध्यक्ष संदीप देसाई, हलगा ग्राम पंचायत सदस्य रणजित पाटील, भुपाल पाटील, राजू पाटील, किशोर हेब्बाळकर, दत्तू कूटरे, ज्ञानेश्वर मेरवा, मदन देसाई, कल्लाप्पा कोलेकर, मष्णू पाटील, महादेव मिराशी, नामदेव फटान, रेमाणी मष्णूचे, रवी पाटील, रामचंद्र गावकर यांच्यासह कापोली, हलसाल, चिंचेवाडी, बामनकोप, सातणाळी आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.