म. ए. युवा समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
बेळगाव : आज महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने लसीकरणातील राजकीय हस्तक्षेप आणि एफएलडब्ल्यू (फ्रंट लाईन वर्कर) निकषातील गैरकारभार थांबवावा याबाबत बेळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले
नमूद विषयाप्रमाणे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेप्रमाणे 21 जून 2021 पासून देशभरात 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण होत आहे. पण बेळगाव तालुक्यात लसीकरणात गैरकारभार व राजकीय हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. गावोगावी आणि गल्लोगल्ली राजकीय नेत्यांच्या नावानिशी फॉर्म वाटून आणि विशिष्ट पक्षाच्या मर्जीतील लोकांनाच सदर फॉर्म असेल तर एफएलडब्ल्यू निकषाखाली लसीकरण केंद्रात प्रवेश दिला जात आहे. आणि जे सामान्य नागरिक खरोखर एफएलडब्ल्यू निकषात मोडतात ते या लसीकरणातून वंचित रहात आहेत. तेव्हा हे कुठेतरी राजकीय हस्तक्षेपातून घडतंय अशी शंका उपस्थित केली जात आहे.
दि.21 जुन रोजी बेळगाव जिल्ह्यात जे महालसिकरण झाले त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात एफएलडब्ल्यू निकषाखाली कोविशील्डचे एकूण 11408 जणांचे लसीकरण झाले. पण यापैकी बेळगाव तालुक्यातच 11323 जणांचे लसीकरण झाले आहे, यावरून या निकषाचा गैरवापर होत आहे हे स्पष्ट दिसत आहे.
तेव्हा प्रशासनाने याबाबत चौकशी करून जनतेच्या मनातील संभ्रम दूर करावा. आणि ही कोविड लसीकरण मोहीम राजकीय हस्तक्षेपाशिवाय आणि निष्पक्ष पारदर्शकरित्या राबविण्यात यावी.
सदर निवेदनाचा गांभीर्याने विचार करून 18 वर्षावरील जे पात्र लाभार्थी आहेत त्या सर्वांना लवकरात लवकर लस उपलब्ध करून द्यावी यासाठी आमच्या संघटनेच्यावतीने सर्व प्रकारचे साहाय्य करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणात कोणत्याही प्रकारचे राजकारण होत असेल तर त्याबाबत चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिले.
यावेळी समिती नेते भागोजीराव पाटील, युवा समिती कार्याध्यक्ष सुरज कुडूचकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, विनायक कावळे, संतोष कृष्णाचे, अभिजित मजुकर, वासू सामजी, राकेश सावंत, कीरण मोदगेकर, विघ्नेश नावगेकर, जोतिबा पाटील, विक्रांत लाड, निखिल पाटील आदी उपस्थित होते.