महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे पोलीस प्रशासनाला निवेदन

बेळगाव : दिशादर्शक मराठी फलक पाडवणाऱ्या समाजकंटकांवर आणि दोन भाषिकात तेढ निर्माण करणाऱ्या फेसबुक पेजवर कार्यवाही करावी याबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने पोलीस आयुक्त त्यागराजन आणि उपायुक्त श्री. विक्रम आमटे याना निवेदन देण्यात आले.
नमूद विषयाप्रमाणे देसुर गावाच्या हद्दीत असणाऱ्या दिशादर्शक फलकाची 26 जूनच्या मध्यरात्री काही समाजकंटकांनी नासधूस केली आणि तो पाडवला, हा फलक मराठी भाषेत असल्याने पाडवल्याचे प्रथमदर्शनी काही कन्नड संघटनांच्या पेजकरवी समजले. पण ग्रामस्थांनी संयमाने आणि वातावरण शांत ठेवत दिनांक 28 जून रोजी परत तो फलक बसविला आहे. सदर विभागातील सर्व गावातील बहुसंख्य नागरिक मराठी भाषिक असल्याने त्यांच्या सोयीसाठी हा फलक मागील काही वर्षांपासून अस्तित्वात आहे. पण हा फलक लावल्याने पुन्हा काही पेजवरून मराठी विरुद्ध कन्नड भाषिकांना चिथावणी दिली आहे आणि दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण केले जात आहे. मराठी भाषिकांना राज्यद्रोही आणि पाकिस्तानशी तुलना केली जात आहे, संविधानाने दिलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा घाला आहे. या पेजवरील पोस्ट मध्ये ज्या कमेंट येत आहे त्या सुद्धा मराठी भाषिकांना तुच्छ लेखनाऱ्या आणि छ शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या आहेत. तेव्हा पोलीस प्रशासनाने यावर वेळीच लक्ष घालावे आणि फलक पाडवणाऱ्या समाजकंटकांवर आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पेजवर आणि त्यांच्या ऍडमिनवर कायदेशीर कारवाई करावी ही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
या निवेदनासोबत काही पेजच्या पोस्ट आणि कमेंटची कात्रणे जोडण्यात आली.
हे निवेदन स्वीकारत आयुक्त आणि उपायुक्त यांनी चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष सुरज कुडूचकर, भागोजीराव पाटील, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, वासू सामजी आदी उपस्थित होते.