इस्लामाबाद : सत्ताबदल झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. असे असताना आता इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची येथे अफवा पसरली आहे. या चर्चेनंतर पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून इम्रान खान यांचे निवासस्थान असलेल्या इस्लामाबाद येथील बनी गाला या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
इस्लामाबादमध्ये जमावबंदीचे आदेश
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचे म्हटले जात आहे. याच कारणामुळे येथील पोलीस तसेच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पोलिसांनी इस्लामाबाद येथील बनी गाला या परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. तसेच इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू करण्यात आले असून येथे मेळ्याव्याचे आयोजन करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
इस्लामाबाद पोलीस काय म्हणाले?
इम्रान खान यांच्या हत्येच्या अफेवेबद्दल बोलताना इस्लामाबाद येथील बनी गाला या परिसरात पाकिस्तान तहरिक ए इन्साफ या पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांचे आगमन होण्याची शक्यता असल्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली आहे. तसेच येथे हायअलर्ड जारी करण्यात आला आहे. मात्र इम्रान खान यांच्या टीमकडून ते येणार असल्याची अद्याप सूचना मिळालेली नाहीये, असे इस्लामाबाद पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच इम्रान खान यांना पोलिसांकडून पूर्ण सुरक्षा पुरवली जाईल. मात्र त्यांच्या सुरक्षा पथकाकडूही सहकार्य अपेक्षित आहे, असेदेखील पोलीस म्हणाले आहेत.
तर दुसरीकडे इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याच्या चर्चेमुळे खान यांचे पुतणे हसन नियाझी आक्रमक झाले आहेत. आमच्या नेत्याला काहिजरी झाले तरी हा हल्ला पाकिस्तानवरील हल्ला समजण्यात येईल. तसेच या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, अशी आक्रमक प्रतिक्रिया नियाझी यांनी दिली आहे.
