ढाका : बांगलादेशातील चटगाव येथे शनिवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. बांगलादेशमधील चितगाँग येथे एका शिपिंग केंटेनर डेपोला लागलेल्या भीषण आगीत तब्बल 35 जणांचा मृत्यू झाला असून साधारण 450 जण जखमी झाले आहेत.
4 जून रोजी रात्री ही भीषण आग लागली होती. या घटनेत पाच अग्निशमन दलाचे जवानदेखील मृत्युमुखी पडले असून अजूनही या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही.
सरकारी चटग्राम मेडिकल कॉलेज हॉस्पिटल (CMCH) येथे तैनात असलेल्या एका पोलिस अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशमधील चितगाँग मधील शितकुंडा येथे एका शिपिंग कंटेनरच्या डेपोला भीषण आग लागली. या आगीमध्ये आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला असून 450 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरु असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
चित्तगाँग वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात नियुक्त करण्यात आलेले पोलीस अधिकारी नुरुल अलाम यांनी दिलेल्या माहितीनुसार ही आग रासायनिक अभिक्रिया झाल्यामुळे लागली असल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. तसेच रात्री साधारण 9 वाजता ही आग लागली होती. त्यानंतर येथे मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे आग पसरली असं सांगण्यात येतंय. या घटनेची नंतर सखोल चौकशी केली जाणार आहे.
