नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी लंच ब्रेकनंतर नॅशनल हेराल्ड प्रकरणात चौकशीनंतर पुन्हा ईडी कार्यालयात पोहोचले. राहुल गांधी यांची पहिल्या टप्प्यातील चौकशी पूर्ण झाली असून तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली. यामध्ये बँक अकाऊंटसह अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले. यानंतर राहुल गांधी ईडी कार्यालयातून बाहेर पडून तुघलक लेन इथल्या आपल्या निवासस्थानी पोहोचले आहेत. इथून ते दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात गेले. इथे त्यांची आई सोनिया गांधी यांच्यावर उपचार सुरु आहेत. सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर राहुल गांधी पुन्हा एकदा ईडी कार्यालयात पोहोचले आहेत.
दुसरीकडे राहुल गांधी यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावल्याच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन सरकारचा निषेध करत आहेत. यानंतर काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं.
रणदीप सुरजेवाला म्हणाले की, नॅशनल हेराल्डमध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही. नेशनल हेराल्ड कंपनीने यंग इंडिया कंपनीचं कर्ज फेडलं असून कर्मचार्यांना पगारही दिला आहे. आम्ही भाजप सरकारप्रमाणे भारताच्या सरकारी मालमत्ता विकलेली नाही. राहुल गांधी आज ईडी कार्यालयात हजर झाल्याने काँग्रेसने देशभरात ईडी कार्यालयाबाहेर आंदोलन केलं होतं.
