शिवानंद महाविद्यालयातील मराठी विभागात साने गुरुजींची पुण्यतिथी साजरी
कागवाड : भारतीय स्वातंत्र्यसैनिक, सामाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि मराठी साहित्यिक म्हणून प्रचलित असणारे पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरूजी. दुसर्यांना हसवणे सोपे असते. मात्र, दुसर्यांसाठी रडणे हे तितकेच अवघड आहे. त्यासाठी अंतकरण लागते अशी शिकवण देणार्या आणि आपणास प्रिय असणार्या साने गुरूजींचे अनेक पैलू आहेत. ते जसे प्रतिभावंत साहित्यिक आहेत तसेच ते गांधीवादी कार्यकर्ते आणि समाजसुधारक होते. आपल्या कार्यातून, लेखणीतून एक प्रगल्भ अशी विचारधारा समाजात पेरण्याचं काम साने गुरुजींनी हयातभर केले. आईच्या संस्कारांचा असलेला प्रभाव त्यांच्या साहित्यातून नेहमीच जाणवत राहिला. साने गुरूजी यांचे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते. त्यांचे सर्वात लोकप्रिय साहित्य म्हणजे श्यामची आई. यातुन त्यांनी आपल्या आईच्या आठवणींना चांगलाच उजाळा दिला आहे. ते अतिशय भावनाप्रधान आणि संस्कारी होते. त्यांनी अनेक कादंबर्या लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद अशा विविध क्षेत्रात त्यांनी लेखणीचा उपयोग केला. तसेच सगळ्याच्या आवडीची आणि अजूनही स्मरणात राहिलेली कविता म्हणजे ‘खरा तो एकची धर्म’ ही कविता होय. हा संस्कारांचा वारसा विद्यार्थ्यांनी आत्मसात करायला हवा असे प्रतिपादन प्रा. एम एल कोरे यांनी केले.
कागवाड येथील शिवानंद महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने आयोजित साने गुरुजी पुण्यतिथी कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. कोरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख प्रा. अशोक आलगोंडी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर हिंदीचे विभाग प्रमुख प्रा. अमोल पाटील उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी मराठी विभागाची विद्यार्थिनी कु. प्रियांका जाधव हिने साने गुरुजींविषयी आपले मनोगत व्यक्त केले. ती म्हणाली, साने गुरुजींची जडणघडण निसर्ग समृद्ध अशा कोकणात झाली असल्याने तिथल्या निसर्गप्रमाणे त्यांचे साहित्यही समृद्ध आहे. ’विद्यार्थी’ आणि ’काँग्रेस’ सारख्या मासिकातून त्यांनी समाजवादाचा पुरस्कार केला आणि स्वतःचे आयुष्य देखील ते तसेच जगले.
अध्यक्षीय मनोगतात प्रा. अशोक आलगोंडी म्हणाले, स्वातंत्र्यसैनिक म्हणून साने गुरुजींनी देशासाठी दिलेले योगदान महत्वाचे आहे. ’पत्री’ या त्यांच्या पहिल्याच कविता संग्रहात संपूर्ण कविता देशभक्तीपर आहेत. या कवितासंग्रहाचा ब्रिटिशांनी इतका धसका घेतला होता की या पुस्तकावर त्यांनी बंदी घातली. अनेकवेळा तुरुंगवास देखील त्यांनी भोगला. तुरुंगात असतानाच त्यांनी महत्वाची अनेक पुस्तके लिहिली. इथेच वेगवेगळ्या भाषा शिकल्या त्यामुळे त्यांना भारतीय संस्कृतीची संकल्पना सुचली.
यावेळी साने गुरुजींवर विद्यार्थिनी आपली मते मांडली. मराठी विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन कु. अक्षता शिंदे हिने केले तर. आभार प्रा. ए. टी. पाटील यांनी मांडले.
Check Also
यंदाच्या हंगामात ऊसाला प्रतिटन ६ हजार मिळालेच पाहिजेत
Spread the love राजू पोवार ; विधानसभेवरील मोर्चाबाबत निपाणीत बैठक निपाणी (वार्ता) : दोन वर्षापासून …