पंजाब सरकारने केलेल्या नियुक्त्यांवर दोघांमध्ये चर्चा
चंदीगड : पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादात नवजोतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांची गुरुवारी भेट झाली. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीत पंजाब सरकारने केलेल्या नियुक्त्यांवर दोघांमध्ये चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमधील वैमनस्य काही प्रमाणात दूर झाले आहे, परंतु अजूनही अनेक मुद्दे आहेत ज्यावर मतभेद आहेत. या दोन नेत्यांची भेट चंदीगड येथील पंजाब हाऊसमध्ये झाली. नवज्योतसिंग सिद्धू, मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यासह या बैठकीत पर्यवेक्षक हरीश चौधरी, कार्यकारी अध्यक्ष कुलजीत नागरी, मंत्री परगट सिंह बैठकीला उपस्थित होते.
पंजाबमध्ये माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर परिस्थिती सुधारेल, असे मानले जात होते, पण ते अधिकच बिघडत गेली. चरणजीत सिंह चन्नी यांनी अनेक पदांवर केलेल्या नेमणुकीवरून सिद्धू आणि चन्नी यांच्यात संघर्ष झाला आणि सिद्धू यांनी राजीनामा दिला. काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात सिद्धू यांनी राज्य सरकारमधील अनेक पदांवर कलंकित नेमणुका केल्याचा आरोप केला आहे. त्यात कॅबिनेट मंत्री, महाधिवक्ता, डीजीपी इत्यादींच्या नावाचा समावेश आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवज्योतसिंग सिद्धू आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या बैठकीत काही मुद्द्यांवर सहमती झाली आहे, परंतु अनेक मुद्दे अजूनही असे आहेत, ज्यावर एकमत होऊ शकले नाही. सिद्धू अॅडव्होकेट जनरल आणि डीजीपी यांना हटवण्यावर ठाम आहेत, तर चन्नी म्हणाले की, सिद्धूला ज्या नियुक्त्यांवर आक्षेप आहे, त्यावर विशेष सॉलिसिटर नेमला जाऊ शकतो, पण अॅडव्होकेट जनरल काढले जाणार नाहीत. आता ज्या मुद्द्यांवर दोघांमध्ये एकमत झाले नाही त्यावर काँग्रेस हायकमांड निर्णय घेईल.
