बेळगाव : बेळगाव ग्रामीणच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याविरोधात उपहासात्मक विधान करणार्या माजी आ. संजय पाटील यांच्या विरोधात हेब्बाळकर यांचे बंधू काँग्रेस नेते चन्नराज हट्टीहोळी यांनी बोचरी टीका केली आहे. ‘भाजप नेते हे अंधारात येऊन चोरी करणारे चोर आहेत‘ अशी टीका केली आहे.
राजकीय वादातून बुधवारी रात्री माजी आ. संजय पाटील यांनी आ. हेब्बाळकर यांच्यावर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना चन्नराज हट्टीहोळी यांनी भाजप नेत्यांना ‘अंधारात येऊन चोरी करणारे चोर’ अशी उपमा दिली. आ. हेब्बाळकर यांची बदनामी करण्याचे काम ते करत आहेत. आ. हेब्बाळकर यांच्या विरोधात लावलेल्या बॅनर्ससंदर्भात पोलिसात तक्रार केली आहे. आ. लक्ष्मी हेब्बाळकर करत असलेली विकासकामे बघवत नसल्यानेच भाजप नेत्यांची ही उठाठेव सुरु असल्याचे हट्टीहोळी यांनी सांगितले.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघ अतिवृष्टीच्या पट्ट्यात येतो. त्यामुळे रस्ते दुरुस्त करायचे झाल्यास पाऊस थांबल्यावरच करता येतील. ते काम आ. हेब्बाळकर नक्कीच करतील. कारण त्या डेव्हलपमेंट क्वीन, नेहमीच विकासाच्या बाजूने आहेत असेही हट्टीहोळी यांनी सांगितले. माजी आ. संजय पाटील यांच्या आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विरोधातील टीकेची सर्वत्र चर्चा सुरु आहे. हेब्बाळकर यांच्या विरोधातील बॅनर वॉर पोलिसात पोहोचले आहे. आता या दोन आजी-माजी आमदारातील हा संघर्ष कोणते वळण घेतो हे पहाणे कुतूहलाचे ठरणार आहे.
