Saturday , July 27 2024
Breaking News

…तर आणखी सर्जिकल स्ट्राईक करू

Spread the love

अमित शहा यांचा पाकिस्तानला थेट इशारा
पणजी (वार्ता) : काश्मिरातील नागरिकांच्या हत्येसाठी दहशतवाद्यांना मदत करणे पाकिस्तानने थांबवावे. सीमारेषापलिकडून पाकिस्तानने आपल्या कारवायांवर नियंत्रण न ठेवल्यास आम्ही आणखी सर्जिकल स्ट्राईक करु, अशा थेट इशारा केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दिला आहे.
गोव्याच्या धारबंदोरा येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या पायाभरणी समारंभात ते बोलत होते. जम्मू-काश्मीरमध्ये काही दिवसांपासून वाढत चाललेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पाकिस्तानला हा इशारा दिला आहे. या इशार्‍यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा ताणले जाण्याची शक्यता आहे.
अमित शहा म्हणाले, कोणीही आमच्यावर केलेले हल्ले आम्ही खपवून घेत नाही, हे यापूर्वी भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकने सिद्ध केले आहे. त्यामुळे जर तुम्ही सीमेवर शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन केले किंवा काश्मीरमधील आमच्या नागरिकांची हत्या करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही आणखी सर्जिकल स्ट्राईल करू, असा सज्जड दम त्यांनी पाकिस्तानला दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली सर्जिकल स्ट्राईक हे एक महत्त्वाचे पाऊल होते. भारताच्या सीमांवरील शांतता कोणीही भंग करू शकत नाही, हाच संदेश आम्ही या सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून दिला होता. दोन्ही देशादरम्यान चर्चेची एक वेळ होती. मात्र, आता ती वेळ राहिली नसून आता जशात तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमधील हिंदू आणि शीख समुदायावर हल्ले वाढले आहेत. तसेच भारतीय सैनिकांही लक्ष केले जात आहे. भारतीय सैन्य आणि जम्मू काश्मीर पोलीस बहुतांश कारवाया हाणून पाडत असले, तरी पाकिस्तानपुरस्कृत कारवायांमुळे पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता आहे.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांसाठी गिफ्ट; कृषीसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद

Spread the love  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *