मुंबई : भारताची सर्वात शक्तीशाली युद्धनौका आयएनएस विशाखापट्टनम आज भारतीय नौदलात दाखल झाली. या युद्धनौकेवर अनेक आधुनिक शस्त्रे तैनात करण्यात आली आहेत. स्वदेशी बनावटीचे ब्रह्मोस क्षेपणास्त्रही या युद्धनौकेवर तैनात करण्यात आले आहे. जे 70 किमी अंतरावरुन हवेत उडणारे शत्रूचे लढाऊ विमान नष्ट करू शकते.
आयएनएस विशाखापट्टणमच्या कमिशनिंग समारंभाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. आधुनिक गरजा लक्षात घेऊन ही युद्धनौका युद्धासाठी तयार करण्यात आली आहे. या युद्धनौकेची निर्मिती मुंबईतील माझगाव डॉकयार्ड याठिकाणी करण्यात आली असून, ती 75 टक्के स्वदेशी आहे. ही युद्धनौका 163 मीटर लांब आणि 17 मीटर रुंद आहे. याचं वजन 7,400 टन आहे. ही भारतातील सर्वात लांब युद्धनौका आहे, ज्यावर 50 अधिकार्यांसह सुमारे 300 नाविक तैनात केले जाऊ शकतात. अणु, जैविक आणि रासायनिक हल्ल्यांना ते चोख उत्तर देऊ शकते तर, समुद्रात एक किलोमीटर खोलीवर पाणबुड्यांमध्ये लपलेल्या शत्रूंनाही शोधू शकते. येत्या काही वर्षांत या क्लासच्या आणखी तीन युद्धनौका 35,000 कोटी रुपये खर्च करुन बांधण्याचा सरकारचा मानस आहे.
