नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला एकामागून एक झटका बसतोय. आता काँग्रेसचे बडे नेते आणि माजी कायदा मंत्री अश्विनी कुमार यांनी पक्षाला रामराम केला आहे. गेल्या 46 वर्षांपासून ते काँग्रेसचे सदस्य होते. पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन त्यांनी पक्ष सोडल्याची सध्या चर्चा आहे. काँग्रेसच्या प्रभारी सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला.
अश्विनी कुमार यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटलं की, याविषयावर विचार केल्यानंतर मी हा निष्कर्ष काढलाय की, वर्तमान परिस्थितीत आणि आपल्या प्रतिष्ठेला अनुसरुन पक्षाच्या परिघाबाहेर राहून राष्ट्रीय मुद्द्यांवर चांगल्या प्रकारे काम करु शकेन. 46 वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यानंतर या आशेनं पक्ष सोडत आहे की, स्वातंत्र्य संग्रामाद्वारे संकल्पित लोकशाहीचं वचन पूर्ण करण्यासाठी आपण सक्रिय स्वरुपात पुढे जात राहू.
पंजाबमध्ये मोठा झटका
अश्निनी कुमार हे पंजाबमधून काँग्रेसचे राज्यसभा सदस्य होते. दरम्यान, 2022च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांचा राजीनामा देणं काँग्रेससाठी मोठा झटका असू शकतो. हा यासाठी देखील आश्चर्याचा धक्का आहे की अश्विनी कुमार हे सोनिया गांधी यांचे विश्वासू मानले जात होते. ॠ23 नेत्याच्या काळातही त्यांनी सोनिया गांधींच्या बाजूनं भूमिका घेतली होती.
