दक्षिण भारतीय संगीत विश्वातून एक दुःखद बातमी आहे. तेलंगणातील प्रसिद्ध लोकगायक आणि गीतकार गदर यांचं रविवारी (6 ऑगस्ट) रोजी निधन झालं आहे. क्रांतिकारी गीतांसाठी नावाजलेले ‘गदर ‘ यांचं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं आहे. वास्तविक, त्यांचं खरं नाव हे गुम्मडी विठ्ठल राव असं होतं. पण, गदर म्हणून त्यांनी सर्वदूर आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्यावर हैदराबादमधील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते, त्या दरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
गुम्मडी विठ्ठल राव हे त्यांच्या रंगमंचाच्या नावाने लोकप्रिय होते. त्यांना हृदयविकाराचा गंभीर आजार असल्याने त्यांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेलंगणातील लोकांवरील त्यांच्या (गदर) प्रेमामुळे त्यांना उपेक्षितांसाठी अथक लढण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचा वारसा आम्हा सर्वांना प्रेरणा देत राहील.
‘हे’ ठरलं मृत्यूचं कारण
गुम्मडी विठ्ठल राव यांचं फुफ्फुस आणि लघवीच्या त्रासामुळे हैदराबादच्या अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमध्ये निधन झालं. त्यांना हृदयविकाराच्या गंभीर आजाराने ग्रासलं होतं, त्यांना 20 जुलै रोजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हॉस्पिटलने दिलेल्या माहितीनुसार, 3 ऑगस्ट रोजी त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती आणि ते बरेही झाले होते. पण, त्यांना फुफ्फुस आणि लघवीच्या समस्या देखील होत्या, ज्या वयानुसार वाढत गेल्या आणि हेच त्यांच्या निधनाचं कारण बनलं.
राहुल गांधी यांनी व्यक्त केला शोक
प्रसिद्ध गायक गदर यांच्या निधनाने सर्वांनाच दु:खं झालं आहे. अभिनेत्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनीच गदर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील गदर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट केलं की, “तेलंगणातील प्रख्यात कवी, गीतकार आणि कार्यकर्ते श्री गुम्मडी विठ्ठल राव यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झालं. तेलंगणातील लोकांबद्दलचं त्यांचं प्रेम इतरांनाही लढण्यासाठी प्रेरित करते. त्यांचा वारसा आपल्या सर्वांना प्रेरणा देत राहील.”
पूर्वी नक्षलवादी होते गदर
गायक गदर 2 जुलै रोजी तेलंगणातील खम्मम येथे राहुल गांधींनी संबोधित केलेल्या काँग्रेसच्या जाहीर सभेला उपस्थित होते. केंद्रीय मंत्री आणि तेलंगणा भाजपचे अध्यक्ष जी किशन रेड्डी, टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आणि इतर अनेक नेत्यांनीही गायकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. गायक होण्यापूर्वी, गदर हे नक्षलवादी होते, त्यांनी जंगलासह भूमिगत जीवन जगलं. 1980च्या कालखंडात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी-लेनिनवादी) सदस्य झालेले गदर हे संघटनेची शाखा असलेल्या जननाट्य मंडळी या संस्थेचे संस्थापक होते.