राजकोट : गुजरातच्या राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये तब्बल १० लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचं पोलिस आयुक्तांनी सांगितलं.
”आगीमागचं नेमकं कारण काय, याचा तपास सुरु असून शहरातील सगळे गेमिंग झोन बंद करण्याचे आदेश दिले आहेत” अशी माहिती पोलिस आयुक्तांनी दिली. घटनेमध्ये आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शनिवारी सायंकाळच्या दरम्यान ही घटना घडली असून दहा लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलेलं आहे. गेम झोनमध्ये आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. पोलिस आयुक्त राजीव भार्गव आणि जिल्हाधिकारी आनंद पटेल घटनास्थळी दाखल झाले होते.
सदरील घटना राजकोटच्या कालावड रोडवरील टीआरपी गेम झोनमध्ये घडली आहे. आग लागल्यानंतर पाच किलोमीटर दूरपर्यंत धुराचे लोट पसरले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली होती.