
चंदीगड : पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या भगवंत मान सरकारने सत्तेत येऊन एक महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वीज देण्याच्या आश्वासनाबाबत मोठी घोषणा केली आहे. पंजाब सरकारकडून शनिवारी पंजाबमधील प्रत्येक घरात 300 युनिट वीज मोफत दिली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हा नवा नियम येथे 1 जुलै 2022 पासून लागू होईल.
काही दिवसांपूर्वीच आपचे प्रवक्ते मलविंदर सिंग कांग यांनी मीडियासमोर सांगितले होते की पंजाबमधील लोकांना 300 युनिट वीज मोफत देण्याच्या योजनेची ब्लू प्रिंट जवळपास तयार आहे. त्याच वेळी, मंगळवारी मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले होते की त्यांचे सरकार लवकरच राज्यातील जनतेला एक ‘गुड न्यूज’ देईल. या प्रकरणी त्यांच्या पक्षाचे नेते आणि निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी ट्विटमध्ये सांगितले होते.
मात्र, मे-जून हा प्रामुख्याने पेरणीचा मुहूर्त असताना जुलैपासून मोफत वीजपुरवठा सुरू होणार असल्याची चर्चा आहे. यावेळी शेतकर्यांना नियमित वीज पुरवठा आवश्यक आहे. पंजाबमधील वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा असल्याने आणि पेरणीच्या हंगामानंतर हा नियम लागू केला जात असल्याने त्याचा काय परिणाम होतो हे पाहावे लागेल. असे मानले जात होते की सरकार आपल्या घोषणेच्या वेळेवर पुनर्विचार करू शकते.
Belgaum Varta Belgaum Varta