जिल्हा पोलीस प्रमुखांची निपाणीत बैठक : कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर कडेकोट बंदोबस्त
निपाणी(वार्ता) : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाची सुनावणी होणार आहे. अशातच महाराष्ट्रातील राजकीय नेते मंडळी बेळगावात येणार आहेत त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक- महाराष्ट्र सीमाभागात बंदोबस्त वाढविला आहे. या काळात नागरिकांनी आपले व्यवहार सुरळीत ठेवावे, असे आवाहन बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी केले. गुरुवारी (ता.१) दुपारी येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.
डॉ. संजीव पाटील म्हणाले, सीमाप्रश्नी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सीमाभागातील सर्वच घडामोडीवर पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. सीमाभागातील गावासह शहराच्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना त्रास होणार नाही तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने सर्वतोपरी बंदोबस्त केले आहे.
यावेळी त्यांनी मुरगुड रोडवरील आंतरराज्य सीमेवर भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन त्यांना आवश्यक सूचना केल्या. सीमाप्रश्नाच्या पार्श्वभूमीवर अथणी, कागवाड, कोगनोळी, बोरगावसह इतर आंतरराज्य मार्गांवर चेक पोस्ट नाके उभारले आहेत. त्याबरोबरच एस आर पी सी आर पी पथक सह ५०० पोलीस कार्यरत करण्यात आले आहेत. शनिवारी महाराष्ट्रातील मंत्री बेळगावात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अशावेळी त्यांना प्रवेश द्यायचा की नाही? याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार आहे. त्याबाबत जळगाव जिल्हाधिकारी योग्य तो निर्णय घेतील. त्यांच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाणार आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागात भाषिक किंवा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करण्यासाठी पोलीस कटीबद्ध आहेत. निपाणीसह जिल्ह्यातील आंतरराज्य सीमेवरील परिस्थितीची निरंतरपणे माहिती घेते जात आहे. त्यामुळे जुना भागातील नागरिकांनी आपापले व्यवसाय सुरू ठेवून दैनंदिन कामकाज करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी चिकोडीचे पोलीस उपाअधीक्षक बसवराज एलीगार, चिकोडीचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील, निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, शहर पोलीस उपनिरीक्षिक कृष्णवेणी गुर्लहोसुर, ग्रामीणचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक डी.बी. कोतवाल, सदलगा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक भरतगौडा, शेखर असोदेयांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta