कोगनोळी, ता. 12 : येथील शेतकरी राजश्री दादासो पाटील (करडे) यांनी 60 गुंठ्यात 166 टन ऊसाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राजश्री पाटील यांची हणबरवाडी रोडवर सर्वे नंबर 497 मध्ये शेती आहे.
या शेतीमध्ये सुरुवातीला दहा ट्रेलर शेणखत टाकून घेतले. त्यानंतर उभी आडवी नांगरट करून घेतली. शेतातील तन व इतर कचरा वेचून घेतला. शेत स्वच्छ करून घेतले. ट्रॅक्टरच्या सहाय्याने चार फुटी सरी सोडून घेतली. लावणी अगोदर 123216, पोटॅश, निंबोळी पेंड, क्लोरोग्रॅन्युअल खताचा डोस दिला.
86032 ऊस बियाण्याची निवड केली. 1 जून 2021 रोजी एक डोळा पद्धतीने चार बाय दीड अंतराने लावण करून घेतली. लावणी अगोदर बी डोळा याला काही होऊ नये म्हणून बीज प्रक्रिया करून घेतली. लावणी नंतर तिसऱ्या दिवशी पहिली गन्ना मास्टरची आळवणी करून घेतली. आठ ते दहा दिवसात बियांची उगवण झाली. लावणीनंतर विसाव्या दिवशी दुसरी आळवणी करून घेतली. लावणी नंतर पंचविसाव्या दिवशी तुट आळी बघून घेतली. प्रत्येक पंधरा दिवसाला पाण्याचा फेर दिला. सोबतच रासायनिक खत व औषधाची फवारणी केली. गन्ना मास्टर औषधाची प्रत्येक पंधरा दिवसाच्या अंतराने तीन फवारण्या करून घेतली. महिन्यातून एकदा कीटकनाशक औषधाची फवारणी करून घेतली. लावणी नंतर 51 व्या दिवशी चर पाडून रासायनिक खताचा डोस दिला. साठ दिवसानंतर जेटा कोंब मोडून घेतले. 74 व्या दिवशी बैलांच्या साह्याने उसाला भर करून घेतली. 90 व्या दिवशी उसाची बाळ भरणी करून घेतली. 110 दिवसाने रासायनिक खताचा डोस देऊन मुख्य उसाची भरणी करून घेतली. ऊसाला ड्रिप पद्धतीने पाणी दिले.
ऊस लावणीपासून ऊस तुटून जाऊ पर्यंत उसाची चांगली देखभाल प्रकाश अण्णासो निकम यांनी तर विजय मगदूम यांचे मार्गदर्शन मिळाल्याने चांगले उत्पन्न मिळाले असल्याचे राजश्री पाटील यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta