पन्नासहून अधिक अर्ज : ग्रामस्थांची कुचंबणा
कोगनोळी : येथील ग्रामपंचायतीकडून देण्यात येणारे संगणक उतारे गेल्या चार पाच महिन्यापासून वेळेत मिळत नसल्याने ग्रामस्थांच्या ग्रामपंचायतीला फेऱ्या मारण्याचे काम सुरू आहे. यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
गावातील अनेक नागरिकांनी आपल्या घराचे बांधकाम सुरू करण्यासाठी बँक लोन व अन्य कामासाठी संगणक उतारे लागत असल्याने ग्रामपंचायतीकडे अर्ज केले आहेत. पण ग्रामपंचायतीकडून संगणक उतारे मागणाऱ्या अर्जधारकांची कोणत्याही प्रकारची विचारपूस न झाल्याने चार-पाच महिन्यापासून हे लोक ग्रामपंचायतीच्या फेऱ्या मारत आहेत.
ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक चालक शर्मिला हळिज्वाळे यांना सत्ताधारी गटाकडून काही कारणास्तव कमी केल्याने संगणक उतारे मिळणे कठीण झाले असल्याचे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ग्रामपंचायत सदस्य सुनील माने म्हणाले, संगणक चालक शर्मिला हळीज्वळे यांना कोणत्या कारणावरून कमी करण्यात आले आहे. जर कमी केले असेल तर त्यांना ग्रामपंचायतीचे कमी केलेले पत्र देण्यात आले नाही. जोपर्यंत ग्रामपंचायतीकडून लेखी पत्र दिले जात नाही. तोपर्यंत त्यांना कामावर घेऊन नागरिकांची होणारी हेळसांड थांबवण्यात यावी अशी मागणी केली.
ग्राम पंचायत सदस्य कृष्णात भोजे म्हणाले, ग्रामविकास अधिकारी दिलीप जाधव यांच्याकडे कुरली ग्रामपंचायत व कोगनोळी ग्रामपंचायत अशा दोन ग्रामपंचायतीचा कारभार असल्याने कोगनोळी सारख्या मोठ्या गावाला त्यांना वेळ देणे कठीण झाले आहे. यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहे. यासाठी ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामविकास अधिकार्यांची नेमणूक व्हावी अशी मागणी केली. यासाठी तालुका पंचायत अधिकारी यांना सर्व ग्रामपंचायत सदस्य भेटून कायमस्वरूपी नेमणूक व्हावी अशी मागणी करणार आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील यांनी ग्रामपंचायतीकडून ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या ग्रामस्थांना कामासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, नागरिकांची कामे वेळेत व्हावीत, रोजंदारी करणाऱ्या लोकांना कामासाठी पंचायतीमध्ये जास्त वेळ थांबून घेऊ नये अशा कडक शब्दात सूचना केल्या.
यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, ग्राम विकास अधिकारी दिलीप जाधव, धनाजी कागले, सुनील घुगरे, विश्वजीत लोखंडे, सुनील कागले यांच्यासह अन्य ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta