शहरात प्रथमच अनोखा उपक्रम : शहरवासीयातून कौतुक
निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचा राजा म्हणून काम केले आहे. स्वराज्य कसे स्थापन करावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नवीन पिढीसह बाल मनावर लोकापर्यंत पोहोचण्या करिता केलेले कार्य महत्त्वाच्या आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवशी सुधाकर सोनकर कुटुंबीयांनी घरातच शिव पुतळ्याचे पूजन करून शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पुस्तकांचे पूजन करून वैचारिक शिवजयंती साजरी केली त्यांच्या या उपक्रमाचे निपाणी व परिसरातून कौतुक होत आहे.
आपापसातील वैर, मतभेद मिटविण्यासाठी नवीन नाती जोडणे तुटलेली मने जोडणे हे स्वराज्य स्थापन करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले आहे. त्यासाठी प्रत्येकाच्या घराघरात व मनामनात छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल प्रेम व त्यांचे विचार निर्माण होणे गरजेचे आहे म्हणून घरात शिवचरित्र, प्रबोधनात्मक, आरोग्य, चारित्र्य, सामान्य ज्ञान, विज्ञानाची माहिती देणारी पुस्तके संग्रही ठेवले आहेत. विचार प्रबोधनाची शिदोरी देणारी पुस्तके, नवीन पिढीला प्रेरणा देत आहेत तसेच वाचनाची आवड निर्माण होऊन वैचारिकता वाढविण्याचा प्रयत्न सोनाळकर यांनी केला आहे.
यावेळी सुधाकर सोनाळकर, वसुधा सोनाळकर, पवन सोनाळकर, पूजा सोनाळकर, सुरेश खवरे, अरुणा खवरे, सुरेश जांभळे, श्रेणिक जांभळे, रेखा जांभळे, आरती खैरे, आशुतोष खवरे यांच्यासह श्रीनगरमधील नागरिक उपस्थित होते.
——————————————————————-
२५ पुस्तकांचा सहभाग
सुधाकर सोनाळकर यांनी आपल्या घरामध्ये वैचारिक शिवजयंती साजरी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्यासह विविध प्रकारची २५ पुस्तके ठेवून जयंती साजरी केली. त्यामध्ये शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र, राजमाता जिजाऊ, शिवाजी कोण होता, राजर्षी शाहू महाराज, मध्ययुगीन प्राचीन भारताचा इतिहास, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आकाशाची जडले नाते, बळीराजा, विद्रोही तुकाराम, टर्निंग पॉईंट, आपले आरोग्य आपल्या हाती, ज्ञानसागरातील शिंपले, देवाच्या शोधात यासह विविध पुस्तकांचा समावेश होता.
—————————————————————–
‘छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना त्यांचे आचार विचार समजून घेतले पाहिजेत. जयंतीच्या निमित्ताने शिवचरित्राचा खरा इतिहास सर्वांना नवीन पिढीला समजावा यासाठी समाज प्रबोधन झाले पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे असलेली पुस्तके वाचण्यासाठी देण्याची तयारी आहे.’
– सुधाकर सोनाळकर, श्रीनगर, निपाणी