

घाणीचे साम्राज : शेतकरी आक्रमक
कोगनोळी : महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या कालव्यात गाळ व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे महाराष्ट्रातून येणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होत आहे. पाणी कमी येत असल्याने कर्नाटक सीमा भागातील पिके पाण्याअभावी वाळून जात आहेत. यासाठी कर्नाटक प्रशासनाने महाराष्ट्रातील म्हाकवे गावापासून कर्नाटक हद्दीतील कालव्यातील गाळ व स्वच्छता ताबडतोब करून द्यावी अशी मागणी कर्नाटकातील सीमाभागातील शेतकऱ्यांनी केली आहे. या कामी कर्नाटक पाटबंधारे विभागाने ताबडतोब लक्ष घालून कालव्याची स्वच्छता करून शेतकऱ्यांना होणारी अडचण दूर करण्यासाठी या विभागाच्या मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.
महाराष्ट्रातून येणाऱ्या कालव्याचे काम पुर्ण झाले आहे. कर्नाटक हद्दीतील कालव्याचे काम अपूर्ण झाले आहे.
महाराष्ट्र कर्नाटकाच्या नियमानुसार प्रत्येक महिन्याच्या दहा दिवस कर्नाटकाला पाणी देत होते. पण सध्या धरणात पाण्याचा साठा कमी असल्याचे कारण देत सात दिवस पाणीपुरवठा केला जात आहे. हा पाणीपुरवठा कोणताही भेदभाव न करता देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
महाराष्ट्र हद्दीतील म्हाकवे हद्दीपर्यंत पाणी येत असून येथून पुढे कर्नाटक हद्द सुरू झाले नंतर कालव्याचे काम अपूर्ण असल्याने साईडचे बांधकाम व कॉंक्रिटीकरण न झाल्याने गाळ मोठ्या प्रमाणात पडला आहे. यामुळे महाराष्ट्र हद्दीत सोडण्यात येणारे पाणी थोडेफार प्रमाणात कर्नाटक हद्दीत येत होते. ते देखील पाणी गाळ व घाणीच्या साम्राज्यामुळे पुढे सरकेना झाले आहे. यामुळे सीमा भागातील उभी पिके वाळून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
कर्नाटक प्रशासनाच्या पाटबंधारे विभागाच्या या अनागोंदी कारभाराचा फटका सीमा भागातील शेतकऱ्यांना बसणारा आहे. यासाठी प्रशासनाने लक्ष देऊन होणारी समस्या लवकरात लवकर दूर करावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे येथील शेतकरी वर्गातून सांगण्यात आले.
———————————————————–
महाराष्ट्रातील कर्नाटकात असणाऱ्या कालव्यात मोठ्या प्रमाणात गाळ व इतर घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने पाणी येण्यास अडथळा निर्माण झाला आहे. प्रशासनाने कालव्याची ताबडतोब स्वच्छता करावी
श्री. बजरंग पाटील (गवळी) शेतकरी हदनाळ, ता. निपाणी
—————————————————————
पाटबंधारे विभागाच्या अनागोंदी कारभाराचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. यासाठी या विभागाच्या लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन समस्या मार्गी काढावी.
श्री. मधुकर पाटील, शेतकरी हदनाळ ता. निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta