गटनेते विलास गाडीवड्डर यांचा आरोप : पाणी प्रश्नाच्या बैठकीला सत्ताधाऱ्यांनी दिली बगल
निपाणी (वार्ता) : शहरवासीयांना सुरळीत पाणी मिळावे यासाठी विरोधी नगरसेवक व नागरिकांनी गुरुवारी (ता.१६) नगरपालिकेवर मोर्चा काढला. यावेळी मंगळवारी (ता.२१) सभागृहात विशेष बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असे नगरपालिका आयुक्त व नगराध्यक्षांनी मोर्चे का-यासह विरोधी गटाच्या नगरसेवकांना सांगितले होते. त्यानुसार सत्ताधाऱ्यांचा शब्द अंतिम म्हणून मंगळवारी विरोधी गटाच्या नगरसेवकांसह नागरिकांनी सभागृहात चर्चेसाठी हजेरी लावली होती. पण सत्ताधाऱ्यांसह आयुक्तांनी या बैठकीला बगल दिली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना पाणी प्रश्नापेक्षा प्रसिद्धीच महत्त्वाची असल्याचा आरोप विरोधी गटनेते विलास गाडीवड्डर यांनी केला.
गाडीवड्डर म्हणाले, पाण्यासाठी मोर्चा काढला असतानाही सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी केवळ खोटे बोलले आहेत. पाणी समस्येतून मार्ग काढता येत नाही म्हणूनच आयुक्त आणि नगरसेवकांनी पळ काढला आहे. यावरूनच नागरिकांच्या पाण्याबाबत कुणालाही देणे घेणे नसल्याचे स्पष्ट होत आहे.
खासदार, मंत्री महोदय आणि नगरपालिका पदाधिकारी कामाच्या उद्घाटनासह गंगा पूजनाचे श्रेय घेतात. मग पाणी प्रश्नाकडे का पाहत नाहीत. निपाणी नगरपालिका राज्यात मॉडेल बनवणार असल्याचे खासदार, मंत्री, सत्ताधारी सांगत असून दहा वर्षात त्याची पूर्तता का झाली नाही. याउलट मुख्य रस्त्यावरील दुभाजकावरील पथदीपही सुरू करता आलेले नाहीत. मंत्री महोदय यांनी आपल्या वाढदिवसा दिवशी 24 तास पाणी योजनेचे उद्घाटन करूनही अजूनही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नवरत्न योजनेच्या तिसऱ्या फेज चे काम अजून अपूर्ण आहे यावरूनच योजना पूर्ण करण्यास ते अकार्यक्षम बनल्याचे सिद्ध होत आहे.
विरोधी गटाच्या प्रभागात एकही काम झालेले नसून १८ प्रभागातील नागरिकांचा तरी विकास झाला का हे पहावे कोटी रुपयाचे काम केले असते तर प्रत्येक प्रभागात १० कोटींची विकास कामे झाली असती. अडीच वर्षे सत्ता असूनही कामाची पूर्तता करता आलेली कोरोना काळाचे निमित्त पुढे करून काम झाले नसल्याचे सांगणे चुकीचे आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी व्यासपीठ ठरवून चर्चेला यावे असे आवाहनही गाडीवड्डर यांनी केले. यावेळी नगरसेवक बाळासाहेब देसाई -सरकार, डॉ. जसराज गिरे, दत्ता नाईक, शौकत मनेर, दिलीप पठाडे यांच्यासह नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते.
——————————————————————
दोन्हीकडे सरकार असून नदी कोरडी का?
कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात दोन्हीकडे भाजपचे सरकार आहे. त्यामुळे उन्हाळ्यात जाणवणारी पाणी टंचाई लक्षात घेऊन मंत्री महोदयांनी पाठपुरावा करून वेदगंगा नदीत पाणी आणणे महत्त्वाचे होते. पण त्यांच्या दुर्लक्षामुळेच नदी कोरडी पडल्याचा आरोप गाडीवड्डर यांनी केला.
——————————————————————-
‘मोर्चेकरांना चर्चेसाठी मंगळवारी बैठक घेण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. पण त्याबाबत कोणतीही नोटीस काढलेली नव्हती. शिवाय आपली तहसीलदार कार्यालयात निवडणुकीबाबत बैठक असल्याने लवकरच नोटीस काढून या संदर्भात चर्चा केली जाईल.’
-जगदीश हुलगेज्जी, नगरपालिका आयुक्त, निपाणी
——————————————————————
‘पाणी प्रश्नाबाबत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी नगरपालिकेत मंगळवारी बैठक घेण्यात येईल, असे सांगितले होते. पण ही बैठक काही अडचणीमुळे पुढे ढकलले असून लवकरच सर्वांना नोटिसा पाठवून याबाबत विशेष बैठक घेतली जाईल.’
-जयवंत भाटले, नगराध्यक्ष, निपाणी