लाखो भाविकांची उपस्थिती : दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम
कोगनोळी : श्री हलसिद्धनाथ महाराज की जय, चांगभलंच्या जयघोषात, खारीक, खोबरे भंडाऱ्याची उधळण करत आप्पाचीवाडी तालुका निपाणी येथील आप्पाचीवाडी-कुर्ली हालसिद्धनाथ पाडवा यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
दोन दिवसात लाखो भाविकांनी हालसिद्धनाथ देवाचे दर्शन घेतले.
यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
बुधवार तारीख 22 रोजी सकाळी सात वाजता कुर्ली येथील हालसिद्धनाथ मंदिरातून सवाद्य पालखी मिरवणूक निघाली. पालखी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून आप्पाचीवाडी येथील घुमट मंदिर येथे आली. या ठिकाणी वालंग, ढोल वादन व विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. पालखी मिरवणूक आप्पाचीवाडी येथील वाडा मंदिरात आली. या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. आप्पाचीवाडी व कुर्ली येथील पालखी मिरवणूक खडक मंदिरात आली. या ठिकाणी पालखी प्रदक्षिणा झाली. या पालखी प्रदक्षिणेत अश्व, छत्र्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. पालखी सोहळा मंदिरात आल्यावर वालग, ढोल वादन झाला. यावेळी हेडाम खेळवण्यात आले. मुख्य मूर्तीची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळी सात व रात्री सात वाजता मानकरी व पुजारी यांच्या उपस्थित आरती करण्यात आली. रात्री ढोल जागर करण्यात आला.
गुरुवार तारीख 23 रोजी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम, मानकरी पुजारी यांच्या उपस्थितीत आरती झाली.
सायंकाळी पाच वाजता वालंग, ढोल वादन झाले. अश्व, छत्र्या मानकरी पुजारी यांच्यासह पालखी प्रदक्षिणा झाली. यावेळी भाविकांच्याकडून खारीक खोबरे व भंडाराची मोठ्या प्रमाणात उधळण करण्यात आली. पालखी प्रदक्षिणा झाल्यावर आप्पाचीवाडीतील मुख्य रस्त्यावरून वाडा मंदिर येथे आपाचीवाडी पालखी विराजमान झाली. कुर्ली पालखी घूमर मंदिर व तिथून पुढे कुर्लीकडे रवाना झाली. कुर्ली येथील गावातील प्रमुख मार्गावरून पालखी मिरवणूक हालसिद्धनाथ मंदिरात आल्यावर या यात्रेची सांगता करण्यात आली.
कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने उपनिरीक्षक प्रविण गंगोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.