माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या : निपाणीत प्रचार सभा
निपाणी (वार्ता) : भाजपा सरकारने दिलेल्या वचना पैकी एकही वचन पूर्ण करता भ्रष्टाचार करण्याचा उच्चांक केला आहे. गेल्या चार वर्षात कोणतेही विकास काम केलेले नाही. महागाई वाढवून सर्वसामान्यांच्या पोटावर पाय आणले आहे. शिवाय कर्नाटक राज्याला भ्रष्टाचाराचा कलंक लावला आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना व मंत्री शशिकला जोल्ले यांना खड्यासारखे उचलून बाजूला ठेवण्याबरोबरच काकासाहेब पाटील यांना निवडून द्यावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या यांनी केले. मंगळवारी (ता.२५) येथे काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
सिद्धरामय्या म्हणाले, भाजप सरकारने सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे हित जोपासलेले नाही. याउलट महागाई वाढवली आहे. आपण सुरू केलेल्या सर्वच योजना भाजपने बंद केल्या आहेत. ऑपरेशन कमळ करून एक हजार कोटी रुपये त्यासाठी खर्च करून मागच्या दाराने सत्ता मिळवली आहे. त्यामुळे आमदारासाठी केलेला खर्च कुठून आला याची माहिती द्यावी. मंत्री जोल्ले यांनी दोन वेळा निवडून येऊन सुद्धा प्रचारासाठी कर्नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा त्यांची गरज का पडली? शिवाय अंडी घोटाळ्यामुळे त्यांचे मंत्रिपदही बदलले गेले. त्यामुळे भाजपा सरकारसह जोल्लेंना मुळासकट उखडून टाका. शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे नसून मोठ्या उद्योगपतींचे कोट्यावधीचे कर्ज माफ केले गेले. त्यावरून सरकारचे भ्रष्टाचार स्पष्ट होते. त्यामुळे काकासाहेब पाटील यांच्यासारख्या प्रामाणिक उमेदवाराला निवडून देणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी, कर्नाटकात परिवर्तन अटळ असून भ्रष्टाचारी भाजप सरकारला बाजूला करण्याची वेळ आली आहे. सध्या काँग्रेसचे वारे असून मराठा समाजाच्या वाघाला शेवटचे मतदान करावे. काकासाहेब पाटील यांनी काँग्रेसला जिवंत ठेवण्याचे काम केले असून राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर शेतकरी सर्वसामान्य नागरिकांची काळजी घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
उमेदवार काकासाहेब पाटील यांनी, आपल्या कारकिर्दीमध्ये शाश्वत विकास कामे केली असून या पुढील काळात काँग्रेस पक्षाची घडी बसवून भविष्यात काँग्रेस बळकटीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी खासदार प्रकाश हुक्केरी, राजेंद्र वडुर, सुमित्रा उगळे, अण्णासाहेब हवले, विनोद साळुंखे, सिताराम पाटील, अभिजीत बोधले, सुप्रिया पाटील, प्रमोद पाटील, संजय कांबळे यांनी मनोगत केले.
माजी मंत्री पाटील यांनी स्वागत तर चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी प्रस्ताविकात काँग्रेस आणि काकासाहेब पाटील यांनी केलेल्या कामांचा आढावा घेतला. सभेस प्रकाश राठोड, पक्ष निरीक्षक मोहन जोशी, सुनील हनुमनावर, आमदार गणेश हुक्केरी, सिद्धलिंग सावकार, राजेश कदम, रोहन साळवे, निपाणी मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.