३१ शाळा सुरू : पावसाळ्यात विद्यार्थ्यांना धोका
निपाणी (वार्ता) : दरवर्षी शाळा सुरु होण्याआगोदर व पावसाळ्याच्या तोंडावर पडक्या, गळक्या व धोकादायक शाळांच्या वर्गखोल्यांची दुरुस्ती केली जाते. मात्र शाळा सुरू होण्यास केवळ एक दिवसाचा कालावधी शिल्लक असताना निपाणी गटशिक्षणाधिकारी कार्यालय कार्यक्षेत्रातील अद्याप शाळांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नवीन शैक्षणिक वर्षाला ३१ मे पासून सुरवात होणार आहे. गतवर्षीची अतिवृष्टी, पूर परिस्थिती व उन्हाळ्याच्या सुटीत जिल्ह्यातील अनेक शाळांच्या खोल्याचे पूर्णतः नुकसान झाले आहे. तेव्हा शाळा सुरू झाल्यावर मुलांना कुठे बसवावे हा प्रश्न विचारात न घेता शाळा सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांना होणारा धोका लक्षात घेऊन शाळा सुरू होण्याअगोदर दुरुस्ती करणे अपेक्षित होते. जिल्हापरिषदेच्या अनियोजित कारभारामुळे अद्याप खोल्यांची दुरुस्ती झाली नाही. एप्रिल महिन्यात चांद शिरदवाड व परिसरात वादळी वाऱ्यामुळे शाळा खोल्यांचे नुकसान झाले आहे. जून महिन्यापासून पावसाळा सुरु होणार आहे. त्यामुळे मुलांना शाळेच्या मैदानात बसवणे मोठ्या जबाबदारीचे काम असेल. वेळेच्या अगोदर शाळांची दुरुस्ती करावी अशी मागणी पालकांसह शिक्षकांनी शासनाने केली होती. पण त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे आता शिक्षण विभागाकडून तातडीने पडक्या, गळक्या व पडझड झालेल्या शाळांची माहिती घेणे सुरु केले आहे.
——————————————————
सरकारी शाळा मिळविताहेत नावलौकिक
रचनावादी पद्धत, बोलक्या भिंती, प्रगत शैक्षणिक धोरण, आयएसओ मानांकन शाळा, अशा वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून सरकारी शाळा नावलौकिक मिळवीत आहेत. तर काही शाळांना पडझड झालेल्या वर्गखोल्या दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहेत.
——————————————————–

‘अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे अनेक शाळा खोल्यांची दुरावस्था झाली आहे. याबाबत जिल्हा पंचायत बैठकीत आवाज उठवूनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. तरी विद्यार्थ्यांच्या धोका टाळण्यासाठी तात्काळ वर्ग खोल्यांची दुरुस्ती करावी.’
– राजेंद्र वड्डर, माजी जिल्हा पंचायत सदस्य,भोज
————————————————————
‘यंदा ३१ मे पासून शाळा सुरु होणार आहेत. त्याअनुषंगाने मध्यंतरी चांद शिरदवाड सह परिसरातीलदुरावस्था झालेल्या शाळा खोल्यांची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवली आहे त्यानुसार निविदा काढून त्यांची दुरुस्ती होणार आहे.’
– रेवती मठद, गटशिक्षणाधिकारी, निपाणी.
Belgaum Varta Belgaum Varta