शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण : जत्राटमध्ये पकडली सहा फूट मगर
निपाणी (वार्ता) : वेदगंगा आणि दूधगंगा नदीच्या पात्रातील पाणी पूर्णपणे कमी झाले आहे. त्यामुळे पात्रातील लहान मोठ्या मगरी शेतीवाडीसह लोक वर्दळ असलेल्या रस्त्यावर येत आहेत. दोन दिवसांपूर्वी कुन्नुर येथील नदीच्या पात्रात भली मोठी मगर आढळली होती. त्यानंतर बुधवारी (ता. ३१) दुपारच्या सत्रात जत्राट नदी जवळ संजय पाटील या शेतकऱ्यांला मगर दिसून आली. त्यांनी गावातील युवकांना संपर्क साधून रात्रीच्यावेळी सापळा रचून सहा फूट लांबीची मगर जेरबंद केली. त्यानंतर वन विभागाकडे मगर सुपूर्द करण्यात आली.
नदीच्या बोळेवाडी गावाच्या बाजूस शेतकऱ्यांचे गवताचे गड्डे व विद्युत मोटारी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा वावर या भागात असतो. त्यामुळे पासून धोका होण्याची शक्यता असल्याने विकास जबडे, दादासाहेब पाटील, ओंकार जबडे, विशाल धारकाडे, भरत जबडे, प्रवीण पाटील, रवी पाटील, शिवंम भिवसे यांच्यासह युवकांनी एकत्र येऊन या मगरीला पकडून वन विभागाकडे सुपूर्द केले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा विश्वास सोडला आहे.
दोन दिवसापूर्वी कुन्नूर- मांगुर पुलानजीक दूधगंगा नदी किनाऱ्यावर कुन्नूरच्या दिशेला नागरिकांना मगरीचे दर्शन झाले. कुन्नूर येथील शेतकरी बाळासो चौगुले, दाजीराव करडे हे आपली मोटर पंप दुरुस्त करण्यासाठी मेस्त्री संजय खोत यांना आपल्या शेताकडे घेवून जात असताना नदी किनाऱ्यावर या मगरीचे दर्शन झाले.
ही मगर जवळजवळ आठ ते दहा फूट लांब आहे. कुन्नूर परिसरातील दूधगंगा व वेदगंगा नदीमध्ये अनेक दिवसापासून मगरींचा वावर आहे. सुळकुड, गजबरवाडीपासून कुन्नूर, मांगुर, बारवाड भोज नदीकिनाऱ्यावर अनेकदा मगरीचे दर्शन झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नदीकाठावर कोणीही न जाण्याच्या देण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी या मगरीचे बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.