जत्राट वेस बौद्ध समाजातर्फे घटनेचा निषेध : तहसीलदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : नांदेड जिल्ह्यातील बोंढार (हवेली) येथील बौद्ध तरुण अभय भालेराव या तरुणाचा जातीवादी गावगुंडानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याच्या कारणावरुन खून करण्यात आला आहे. याशिवाय मुंबईतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील मुलीवर अत्याचार करून तिचाही खून करण्यात आला आहे. या दोन्ही घटनांचा गुरुवारी (ता.८) येथील जत्राट वेस मधील बौद्ध समाजातर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. येथील जत्राट वेस पासून तहसीलदार कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. दोषीवर कारवाई करण्याबाबत तहसीलदार विजय कडगोळ यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, नांदेड जिल्ह्यातील बोंढार (हवेली) येथील बौद्ध तरुण अक्षय भालेराव या तरुणाचा जातीवादी गुंडानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांची जयंती साजरी केल्याच्या कारणावरून त्याचा खून करण्यात आला. शिवाय त्यांच्या कुटुंबीयांनाही मारहाण केली आहे. या क्रूर घटनेमुळे पुरोगाची महाराष्ट्राची मान शरमेने खाली झाली आहे. या घटनेचा आम्ही निषेध करीत आहोत. सदरील प्रकरणात लक्ष घालून भालेराव कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा.
अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांना पन्नास लाखाची आर्थिक मदत देण्यात यावी.त्यांचा जखमी भाऊ नवमी यास शासकीयनोकरीत समाविष्ट करून घेण्यात यावे. हत्या प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे. त्यासाठी सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी.या प्रकरणाचा तपास नांदेड येथील नागरीक सुरक्षा अधिकारी योगेशकुमार यांच्याकडे देण्यात यावा.
भालेराव कुंटुंबियांना तात्काळ कायम स्वरूपी पोलीस संरक्षण मिळावे. गावातील बौद्ध समाजाच्या संरक्षणासाठी पोलीस ठाण्याची निर्मिती करावी. सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करावी अशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी लोकेश घस्ते, ओंकार घस्ते, प्रवीण वाघपट्टे, युवराज पोळ, रवी श्रीखंडे, सुरज कांबळे यांनी मनोगतातून या घटनेचा निषेध व्यक्त करून भालेराव कुटुंबीयांना न्याय देण्याची मागणी केली. यावेळी जीवन घस्ते, संदीप माने, ऋतिक कांबळे, अमित कांबळे, रतन पोळ, आरेश सनदी, महेश कांबळे, शशिकांत कांबळे, किशोर घस्ते, अरबाज कांबळे, किशोर कांबळे, नामदेव कांबळे, शुभम माने, उत्तम वाळके, सुशांत खराडे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta