
‘शक्ती’ योजनेतून उपक्रम; महिलांच्या चेहऱ्यावर हास्य
निपाणी (वार्ता) : विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनामध्ये राज्यात सत्ता आल्यास काँग्रेसने महिलांना राजभर मोफत प्रवास उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज्यात काँग्रेसच सरकारची सत्ता स्थापन झाल्यानंतर केवळ महिन्याच्या आतच महिलांसाठी ‘शक्ती’ योजना रविवारी सुरू केली. दुपारी एक वाजता या योजनेचा प्रारंभ होऊन रविवारी दिवसभरात निपाणी आगाराच्या बसमधून ३० हजार ९१२ रुपये किमतीच्या तिकिटाच्या १३२७ महिलांनी मोफत बस प्रवास केला. यावेळी सर्वच महिलांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून येत होते. शिवाय या योजनेमुळे महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
काँग्रेसने निवडून आल्यानंतर पाच गॅरंटी योजना राबवणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार पाच पैकी ‘शक्ती’ योजना पहिल्यांदाच सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थिनी महिलांना राज्यभर मोफत बस प्रवास करण्यात आला आहे. ऑर्डीनरी आणि जलद बस मध्येच ही सेवा उपलब्ध आहे. महिलांना वातानुकूलित बसमध्ये ही सेवा उपलब्ध नाही. या योजनेतील लाभार्थी महिलांना गुलाबी रंगाचे तिकीट दिले जात आहे. सेवा मोफत असली तरी प्रत्येकाने शुन्य रुपयाचे तिकीट घेणे बंधनकारक आहे. तिकीट तपासणी झाल्यानंतर सदरचे तिकीट अधिकाऱ्यांना दाखविणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक महिलांना आपले तिकीट मागून घ्यावे लागणार आहे. मोफत प्रवासासाठी महिलांना स्वतःचे आधार कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा कोणत्याही वाहन चालविण्याचा परवाना यापैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवणे बंधनकारक आहे. रविवार पासून ही योजना सुरू होणार असल्याने अनेक महिला प्रवाशांनी सकाळी दहा वाजल्यापासूनच निपाणी आगारात गर्दी केली होती. दुपारी एक वाजता होणार असल्याने अनेक महिला मोफत प्रवास करण्यासाठी तासंतास बसून होत्या. तर काही महिलांना ओळखपत्र बंधनकारक असल्याचे माहित नसल्याने त्यांनी रक्कम देऊन तिकीट काढून प्रवास केला. आता ही योजना सुरू झाली असून ओळखपत्र सक्तीची माहिती सर्वांना झाल्याने सोमवारपासूनच अनेक महिलांनी स्वतःचे ओळखपत्र घेऊन मोफत प्रवासाचा आनंद लुटला.
निपाणी परिसरातील अनेक महिला नोकरी, व्यवसाय, नातेवाईक अशा विविध कारणामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्रास प्रवास करत असतात. पण ही योजना केवळ कोगनोळी पर्यंतच आहे. त्यामुळे कर्नाटकाची सीमा संपताच पुढील प्रवासासाठी त्यांना रोखीने तिकीट काढावे लागणार आहे. याशिवाय गडहिंग्लज, कापशी, आजरा, मुरगुड इचलकरंजी, हुपरी, कागल येथे कर्नाटकची सीमा संपताच महिलांना तिकीट काढावे लागणार आहे. त्यामुळे सीमा ओलांडल्यानंतर पुढील वीस किलोमीटर पर्यंत मोफत सेवा देण्याची मागणी महिलातून होत आहे.
———————————————————
बसमध्ये होणार महिलांची गर्दी
शक्ती योजनेतून महिलांना बस प्रवास मोफत करण्यात आला आहे. त्यामुळे एरव्ही खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या महिला आता केवळ बस मधूनच प्रवास करणार आहेत. त्यामुळे बसमध्ये महिलांचीच गर्दी होणार आहे.
————————————————————
‘शक्ती योजनेच्या पहिल्याच दिवशी प्रवासासाठी महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आता यापुढे काळात बस मध्ये बसण्यासाठी महिलांसाठी राखीव असलेल्या आसनाचा महिलांना लाभ मिळणार आहे. अशा पद्धतीचे नियोजन केले आहे.’
– संगाप्पा, आगार प्रमुख, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta