निपाणीतील 534 मते कोणाच्या पारड्यात : राजकीय तर्कवितर्कांना उधाण
निपाणी : येत्या 10 डिसेंबरला विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होत आहे. जिल्ह्यात तिरंगी लढत होणार असून भाजपचे महांतेश कवठगीमठ, काँग्रेसकडून चन्नराज हट्टीहोळी व लखन जारकीहोळी हे अपक्ष निवडणूक लढणार आहेत. सर्वांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. दरम्यान या निवडणुकीत निपाणी तालुक्यात 534 मतदार आहेत.
निपाणी विधानसभा मतदारसंघात भाजप व काँग्रेस दोन्ही गट तुल्यबळ आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी स्थानिक पातळीवर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. प्रचारानिमित्ताने उमेदवारांसह स्थानिक नेते, कार्यकर्त्यांनी मतदारांशी संपर्क वाढविला आहे. भाजप उमेदवार कवटगीमठ यांची व काँग्रेस उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांची निपाणीत प्रचार सभा झाली आहे. दोन्ही पक्षातील स्थानिक नेत्यांनी जोर लावला असून निवडणुकीत रंग चढत चालला आहे.
मतदारसंघात भाजपकडून मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले व कार्यकर्ते प्रचाराला लागले असून काँग्रेसकडून माजी मंत्री वीरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, लक्ष्मण चिंगळे हे काँग्रेस उमेदवारासाठी व्यूव्हरचना आखत आहेत. युवा नेते उत्तम पाटील हे अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांचा प्रचार करत असल्याचे दिसत आहे. दरम्यान या निवडणुकीत तालुक्यातील 534 मते कुणाकुणाच्या पारड्यात जाणार, हे अस्पष्ट आहे.
—-
लाखोंचे आमिष
विधानपरिषद निवडणूकीत मतदार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांना या निवडणुकीत लाखोंचे बंद पाकीट मिळणार असल्याची चर्चा आहे. निवडणूक तिरंगी व प्रतिष्ठेची बनल्याने पाकीट वजनदार असेल, असेही म्हटले जात आहे.
