खानापूर (प्रतिनिधी) : एम. के. हुबळी येथील मलप्रभा साखर कारखाना विविध कारणांनी डबघाईत आला असताना सन् 2020-21 सालातील गळीत हंगामातील साखरेचा उतारा कमी दाखवून कारखाना संचालक मंडळाने 18 हजार क्विंटल साखर लाटण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र शेतकरी वर्गाने वेळीच तपास लावून साखर सील बंद केली आहे. ही गंभीर बाब आहे. तेव्हा राज्य सरकारने याची सखोल चौकशी करून, संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी रयत संघाचे नेते गुरूलिंगया पुजीर यांनी खानापूर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात बोलाविलेल्या परिषदेत माहिती दिली.
गेल्या वर्षी या साखर कारखान्याने टनाला 2300 रूपये दराप्रमाणे बिले दिले. काही बिले देणे बाकी आहेत. यासाठी उर्वरित बिले केंव्हा देणार असा सवाल शेतकर्यांनी चेअरमन नाशीर बागवान यांना विचारता त्यांनी शेतकर्यांना उध्दट उत्तरे दिली. गेल्या हंगामातील फक्त 139 क्विंटल साखर शिल्लक आहे. बिले कशी देणार असे उत्तर दिले.
यावेळी शेतकर्यांनी साखरेचे गोदाम उघडा. साखर किती शिल्लक आहे ते पाहतो असा आग्रह धरला. जोपर्यंत गोदाम उघडणार नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असा निर्णय घेतला. त्यामुळे गोदाम उघडावे लागले. चक्क गोदामात 18 हजार क्विंटल साखर आढळून आली. इतकी साखर कशी याचे उत्तर द्या? असे म्हणताच उत्तरे स्पष्ट मिळाली नाही.
चेअरमन नाशीर बागवान यांनी साखर कारखाना प्रगती पथावर आणतो असे सांगून शेतकर्यांची फसवणूक केली आहे. आपले पॅनल निवडून आणून काहीच साध्य केले नाही. शेवटी शेतकरीवर्गाचा विश्वासघात केला.
शेतकरी वर्गाने सहा दिवस आंदोलन केले. मात्र कोणी आमदार किंवा मंत्र्यांनी लक्ष दिले नाही, असा आरोपही केला.
यावेळी पत्रकार परिषदेला गुरूलिंगया पुजार, देवेंद्र हचिमनी, श्री. हळ्ळिकट्टी, रामनगौडा पाटील, बसवराज कुणबी, तसेच रयत संघाचे पदाधिकारी, नेतेमंडळी उपस्थित होते.
Check Also
खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशन व सरकारी दवाखाना यांच्यावतीने रविवारी आरोग्य तपासणी शिबीर
Spread the love खानापूर : खानापूर तालुका डॉक्टर असोसिएशन व सरकारी दवाखाना खानापूर यांच्या सौजन्याने …