ग्रामीण भागातील मुलीचे कौतुक : भविष्यात देणार लोकसेवा आयोगाची परीक्षा
निपाणी (वार्ता) : सततचे मार्गदर्शन, कोचिंग क्लासेस मुळेच शहरी भागातील विद्यार्थी विविध परीक्षांमध्ये उत्तुंग भरारी घेत असल्याचे बोलले जाते. मात्र ममदापूर सारख्या ग्रामीण भागात असलेल्या गौरी शरद कदम हिने नीट परीक्षेमध्ये तब्बल ६२५ घेऊन उत्तीर्ण झाली आहे. तिच्या या यशाचे ममदापूर आणि निपाणी परिसरात कौतुक होत आहे. यापुढील काळात गौरीने लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून उत्तीर्ण होऊन वैद्यकीय क्षेत्रात एमबीबीएस करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
ममदापूर येथील शिक्षक दाम्पत्य शरद कदम आणि सुजाता कदम यांची कन्या असलेल्या गौरी हिचे पहिली आणि दुसरीचे शिक्षण गावातच झाले. तर तिसरी आणि चौथी चे शिक्षण ममदापूर येथे झाले. येथे शिक्षण घेत असतानाच तिने नवोदय परीक्षा दिली होती. त्यामध्ये तिने यश मिळवल्याने सहावी ते दहावीपर्यंत कोथळी येथील नवोदय विद्यालयात शिक्षण पूर्ण केले. दहावी मध्ये ९६ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने पुढील शिक्षणासाठी हुबळी येथील विद्यानिकेतन विज्ञान महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेतला. या ठिकाणी बारावीची परीक्षा दिल्यानंतर या परीक्षेतही तिने पुन्हा ९६ टक्के गुण मिळवून आपले टॅलेंट सिद्ध केले. बारावीची परीक्षा संपताच तिने नीट परीक्षा दिली होती. त्यामध्ये तिला ६२५ गुण मिळाले आहेत. त्यामुळे तिचे परिसरातून कौतुक होत आहे. यापुढील काळात लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन वैद्यक क्षेत्रात आपले करिअर करणार असल्याचे सांगितले. तिला आई-वडिलांसह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.