प्रवाशांना मनस्ताप; पोलीस कर्मचाऱ्यांची मध्यस्थी
निपाणी (वार्ता) : गेल्या चार-पाच दिवसापासून महिलांना मोफत बसविला दिली आहे. त्यामुळे निपाणी आगारात प्रवाशांची गर्दी होत आहे. अशातच गुरुवारी (ता.१५) सकाळी साडेअकरा वाजता सुमारास चालक वाहकाची ड्युटी लावण्यावरून आगारातच गोंधळ झाला. त्यामुळे बस मध्ये बसलेल्या प्रवाशांना सुमारे तासभर विनाकारण मनस्ताप सहन करावा लागला. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने प्रवाशांनी भरलेली बस संबंधित मार्गावर मार्गस्थ झाली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, निपाणी आगाराची निपाणी -गडहिंग्लज बस (क्र. केए २५ एफ-३२४५) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास फलाटवर लावली होती. त्यामुळे गडहिंग्लज मार्गावरील महिला आणि पुरुष बस मध्ये चढले होते. चालक वाहक येईपर्यंत बस प्रवाशांनी खचाखच भरली. अचानकपणे आगार प्रमुखांनी त्यांची ड्युटी बदलून अन्यत्र जाण्यास सांगितले. त्यामुळे तिकीट काढलेल्या वाहकासह चालकांनी आपण हीच गाडी गडहिंग्लजपर्यंत जाऊन आल्यानंतर दुसरी ड्युटी करणार असल्याचे सांगितले. पण त्यांच्या वरिष्ठांनी दुसरे चालक वाहक गडहिंग्लज बस घेऊन जातील तुम्ही दुसऱ्या मार्गावर दुसरी गाडी घेऊन जाण्याचे निर्देश दिले. त्यामुळे बराच काळ आगारांमध्ये गोंधळ उडाला. त्यामुळे शेजारीच असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. या गोंधळामध्ये सुमारे तासभराचा वेळ वाया गेला. त्यामुळे प्रवासी वारंवार बस सोडण्याची विनंती करूनही ती निरुपयोगी ठरली. अखेर तासावर नंतर ही बस संबंधित चालक वाहकांनी गडहिंग्लज मार्गावर मार्गस्थ केली. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निस्वास सोडला.
बऱ्याच वर्षापासून येथे आगारात चालक वाहकांना अचानकपणे मार्ग बदलून दिले जात आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यातून नाराजी व्यक्त होत आहे. पण उघड बोलल्यास कारवाई होऊ शकते,या भीतीपोटी कर्मचारी मुकाटपणे सांगतील त्या मार्गावर वाहने मार्गस्थ करत आहेत. त्यामुळे आगारातील सावळा गोंधळ कमी करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी निपाणी आगारात लक्ष घालण्याची मागणी चालक वाहकाने केली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta