सलग ४८ तास स्केटिंग : गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील शिवगंगा स्केटिंग क्लबने २७ ते ३१अखेर आयोजित केलेल्या ‘मोस्ट पिपल काम्लेटींग’या टायटल खाली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे आयोजन केले होते. या रेकॉर्डसाठी देशभरातील विविध राज्यातील २८७ मुलांनी सहभाग नोंदवला. यामध्ये निपाणी येथील कोडणी रोडवरील अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलचा स्केटिंग खेळाडू नील बंडू पाटील यांने सहभाग नोंदवून यश मिळवत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये आपले नाव कोरून आकाशाला गवसणी घातली आहे.
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड साठी ४८ तासांचा रिले रेकॉर्ड होता. ज्यामध्ये प्रत्येक वेळी २०० मीटर स्केटिंग रिंगचे १०० मीटर हे अंतर ११.२१ सेकंदात पूर्ण करणे बंधनकारक होते. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता हे रेकॉर्ड रात्र-दिवस केले गेले. या रेकॉर्डसाठी मुलांचा स्टॅमिना तर लागतोच. त्याशिवाय मेहनत करण्याची तयारी देखील लागते. रेकॉर्डला उतरण्यापूर्वी मुलांची संपूर्ण मेडिकल तपासणी करण्यात आली. त्यानंतर या रेकॉर्डमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली गेली.
२७ व २८ मे मुलांचे प्रशिक्षण आणि २९ ते ३१ तपासणी केल्यानंतर सलग ४८ तास दिलेला टास्कप्रमाणे सर्व मुलांच्या ग्रुपने २०० मीटर स्केटिंग रिंगचे १०० मीटरचे हे अंतर ११.२१ सेकंदात पूर्ण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये भारताच्या स्केटिंग खेळाडूंची नोंद केली. या रेकॉर्डमध्ये नील बंडू पाटील याच्या सहभागामुळे शाळेचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदले गेले आहे.
या खेळाडूला प्रशिक्षिका सायली मराठे, अंकुरम संस्थेचे अध्यक्ष डॉ. उत्तम पाटील, मुख्यप्रशिक्षक इंद्रजीत मराठे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या चेतना चौगुले व सेक्रेटरी डॉ. अमर चौगुले यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.