सुनील पाटील यांचा पुढाकार; दिंडीचे अक्कोळच्या दिशेने प्रस्थान
निपाणी (वार्ता) : आषाढी एकादशीच्या निमित्ताने कर्नाटक व महाराष्ट्रातील अनेक वारकरी दिंडीच्या माध्यमातून विठू माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना होत आहेत. मेतके जवळील सांगलीवाडी व परिसरातील वारकऱ्यांची सद्गुरु बाळूमामाच्या छायाचित्राची दिंडी निपाणी मार्गे पंढरपूर कडे जात आहे. शनिवारी (ता.१७) दुपारी निपाणी येथील माजी सभापती सुनील पाटील यांनी या दिंडीचे स्वागत करून दुपारी दिंडीतील वारकऱ्यांना स्नेहभोजन देऊन वारकऱ्यांच्या प्रति आपली भक्ती अर्पण केली.
येथील कित्तूर राणी चन्नम्मा चौकात दिंडीचे आगमन होताच सुनील पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिंडीचे स्वागत केले. त्यानंतर टाळ मृदंगाच्या गजरात ही दिंडी अशोकनगर मार्गे महादेव गल्लीतील महादेव मंदिरामध्ये विसावली. यावेळी सद्गुरु बाळूमामा आणि विठू माऊली चे दर्शन परिसरातील भाविकांनी घेतले. या दिंडीच्या मार्गावरही शहर व परिसरातील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी रवींद्र कोठीवाले, मल्लिकार्जुन गडकरी, समीर बागेवाडी, रवींद्र शेट्टी, रवींद्र चंद्रकुडे, बाळासाहेब जाधव, रोहित पाटील, चंद्रकांत चौगुले, बाळासाहेब वसेदार, बाबासाहेब साजन्नावर, गुंडू चंद्रकुडे यांच्यासह महादेव गल्ली गणेशोत्सव मंडळ, महादेव मंदिर सांस्कृतिक उत्सव मंडळ, गणेश हेल्थ क्लबचे कार्यकर्ते व निलांबिका महिला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या. सायंकाळी ही दिंडी अक्कोळ मार्गे पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.
Belgaum Varta Belgaum Varta