निपाणी आगारात गर्दीचा उच्चांक; पोलीस होमगार्डची धावपळ
निपाणी (वार्ता) : गेल्या आठवड्यापासून कर्नाटक सरकारने महिलांना मोफत बस सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे निपाणी आगारात शहरासह ग्रामीण भागातील महिलांची संख्या वाढली आहे. अशातच रविवारी (ता.१८) सुट्टीचा दिवस आणि अमावस्या असल्याने येथील बस स्थानकात गर्दीचा उच्चांक दिसून आला. त्यामुळे गर्दी पांगविण्यासाठी पोलिसासह होमगार्ड कर्मचाऱ्यांचे सहकार्य घ्यावे लागले.
येथील बस स्थानकामध्ये रविवारी स्थानक परिसरात प्रवाशांचे मोठी गर्दी झाली होती. सर्वांच्या सुट्टीचा दिवस, अशातच अमावस्या असल्याने देवदर्शन व इतर कामासाठी प्रत्येक जण आपल्या कुटुंबातील सदस्यांना घेऊन गावी जाण्याचा बेत आखला होता. त्यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासूनच बस स्थानकात प्रवाशांची गर्दी सुरू झाली होती. राज्यात मोफत बस प्रवास सुरू झाल्याने महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. पण मोफत प्रवास असल्याने आगारातील अनेक मार्गावरील बस फेऱ्या कमी करून उपलब्ध बसल्यावरच प्रवाशांची ने -आन सुरू आहे. परिणामी बस येताच त्यामध्ये सोडण्यासाठी महिलांची चढाओढ होत आहे. अशावेळी खिसे कापू आणि महिलांचे दागिने चोरण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे आता बस स्थानकात अशा घटना टाळण्यासाठी पोलीस आणि होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. पण गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी या कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे.
————————————————————-
अमावस्येला मेतके, आदमापूरला जाणाऱ्यांची संख्या मोठी
निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील अनेक भाविकांचे मेतके आणि आदमापुर बाळूमामा हे श्रद्धास्थान आहे. तेथे जाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. रविवार सुट्टीचा दिवस आणि अमावस्या असल्याने अनेक भाविक निपाणी मार्गे मेतके आणि आदमापूरला जात होते. त्यामुळे वडाप खाजगी वाहनालाही मोठी गर्दी झाली होती.
—————————————————————-
‘वाहक आणि चालकांची संख्या कमी असल्याने काही मार्गावर कमी जास्त प्रमाणावर बस सोडण्यात येत आहेत. त्यामुळे स्थानकात गर्दी होत आहे. शिवाय रविवार आणि अमावस्या असल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली. त्यानुसार संबंधित मार्गावर जादा बस सोडली जात आहे. शिवाय दागिने चोरीसारख्या अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलीस आणि होमगार्डची नियुक्ती केली आहे.’
– सांगाप्पा, आगार प्रमुख, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta