निपाणी शहरातील चित्रः आठवड्यातून एकदा पालिकेकडून गढूळ पाणीपुरवठा

निपाणी (वार्ता) : शहरात सध्या नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी विकतच्या जार व टँकरवर भिस्त आहे. शहरात नगरपालिकेतर्फे आठवड्यातून एकदा तोही गढूळ पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामुळे शहरवासीयांची तहान भागणे कठीण झाले आहे. परिणामी नागरिकासह हॉटेल आणि इतर व्यवसायिकांची विकतच्या पाण्यावरच भिस्त आहे.
पालिका प्रशासनाचे शहरातील नागरिकांना सुविधा पुरविताना उदासीन धोरण असल्याचे दिसून येते. पालिका कराचा बोजा आकारते, पण सुविधांचे काय? असा प्रश्नही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. शहरात पालिकेच्या वतीने नागरिकांना विविध कर आकारले जातात. पण कराची वसुली करताना नागरिकांना हव्या त्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत. शहरातील नागरिकांना पालिकेच्या वतीने वेळेत व पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. यामुळे विकतच्या पाण्यावर नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे.
शहरात गल्लोगल्ली पाण्याचे जार विक्री करण्याचा व्यवसाय जोरात सुरू आहे. घरगुती, दुकानदार, व्यावसायिक, हॉटेल चालक, छोटे-मोठे उद्योजक यांना दैनंदिन विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. पाणी विक्रीतून अनेक तरुण युवकाला रोजगार मिळत आहे. तर, दुसरीकडे पाण्याचे जार, टँकर विक्री करणाऱ्यांची सध्या चांदी आहे.
शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीसह अनेक प्रभागांमध्ये अद्यापपर्यंत पाण्याची कोणतीच सुविधा उपलब्ध झाली नाही. यामुळे प्रत्येकाची विकतच्या टँकरवर पूर्णपणे भिस्त आहे.
——————————————————————
शुद्ध पेय जल घटक बंद
शहरात सहा ठिकाणी शुद्ध पेय जल घटक आहेत. पण वाढत्या उन्हामुळे कुप नलिकांच्या पाण्याने तळ गाठला आहे. परिणामी निम्म्याहून अधिक घटक बंद पडले आहेत. त्यामुळे पाणी उपलब्ध असलेल्या घटकावर दिवस रात्र गर्दी होत आहे.
——————————————————————
‘शहर आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला लहान मोठे ७० पेक्षा अधिक हॉटेल कार्यरत आहेत. पण पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने दररोज पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत आहे. याशिवाय इतर व्यवसायांनाही पाण्याची गरज असल्याने विकतचे पाणी घेऊन भुर्दंड असावा लागत आहे.’
– उत्तम सांगावकर, हॉटेल व्यवसायिक, निपाणी
—————————————————————–
‘सध्या वेदगंगा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे यमगरणी जॅकवेल वरून होणारा पाणी उपसा बंद आहे. शिवाय जवाहर तलावाची पाणी पातळी पूर्णपणे खालावली असल्याने आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा सुरू आहे. लवकरच पर्याय शोधून नागरिकांना पाणी देण्याचा प्रयत्न सुरू आहे.’
– जगदीश हुलगेज्जी, नगरपालिका आयुक्त, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta