जुलैमध्ये पेरणीची आशा; यंदाचा खरीप हंगाम धोक्यात
निपाणी (वार्ता) : यंदा उन्हाळ्यातील वळीव पाऊस झालेले नाहीत. शिवाय मॉन्सून उशिरा दाखल झाल्याने जून महिना कोरडा गेला. त्यामुळे बळीराजा हदरला आहे. तर दुसरीकडे जुलै महिन्यात जोरदार पाऊस होईल, असे संकेत हवामान विभागाकडून वर्तविण्यात आले आहे. मात्र, हा अंदाज चुकीचा ठरला तर निपाणी तालुक्यातील खरीप हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. शिवाय पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला आहे.
दरवर्षी जून महिन्यात जोरदार पावसाला सुरवात होते. मात्र, यंदा बदलेल्या हवामानामुळे मॉन्सून उशिरा दाखल झाला. परिणामी जून महिना कोरडा गेला आहे. संपूर्ण जून महिन्यात तालुक्यात सरासरी २६ दिवस कोरडे गेले आहेत. त्यामुळे यंदा पेरण्या रखडल्या आहेत. परिणामी शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात जुलै महिन्यात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मात्र, हा अंदाज चुकीचा ठरल्यास त्याचा परिणाम खरीप हंगामावर होणार आहे.
निपाणी व परिसरात १० जुलै पासून पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज परतविण्यात आला आहे. त्यानंतर सोयाबीनसह इतर पिकांची पेरणी करावी लागणार आहे. त्यामुळे पेरणीचे दिवस पुढे गेल्याने त्याचा उत्पादनावर परिणाम होण्यासह वेगवेगळ्या रोगराईसह किडीचा प्रादुर्भाव होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. जून महिन्यामध्ये निपाणी तालुक्यात शंभर मिलिमीटरही पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करूनही पेरणी केलेली नाही. आता भविष्यात पाऊस पडेल का? याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.
——————————————————————-
कोरड्या दिवसांमुळे अडचणीत भर
तालुक्यात यंदा मॉन्सून उशिरा दाखल झाला. त्यामुळे सरासरी २६ दिवस कोरडे गेले आहेत. गेल्या दोन दिवसापासून शहर व परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. पण अजूनही शेतीवाडी मध्ये म्हणावी तशी ओल झालेली नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
——————————————————————-
तीस दिवसांत ४५ मिलिमीटर पाऊस
जून महिन्यात निपाणी परिसरात १०० मिलिमीटर पाऊस होणे अपेक्षित होते. पण केवळ ४५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्ती तालुक्यात याच काळात १२३.५८ मिलिमीटर पाऊस झाला होता. मात्र यावर्षी संपूर्ण जून महिन्यात केवळ ४५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे.
——————————————————————
‘सध्या पावसाळी वातावरण असले तरी किरकोळ पाऊस सुरू आहे. त्यामुळे जमिनीत ओल झालेली नाही. पेरणीसाठी शंभर किलोमीटर पेक्षा अधिक पावसाची गरज आहे. पण केवळ ४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईगडबडीने पेरणी केल्यास उगवण क्षमता कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य पाऊस पडल्यानंतरच पेरणी करावी.’
– दीपक कौजलगी, प्रभारी, कृषी अधिकारी, निपाणी