
आचार्य श्री १०८ कुलरत्नभूषण महाराज; बोरगाव येथे बंद शांततेत
निपाणी (वार्ता) : हिरेकुडी (ता. चिकोडी) येथील १०८ मुनीश्री कामकुमार नंदी महाराज यांची अमानूषपणे हत्या करण्यात आली. जगाला अहिंसेचे संदेश देणारे व समस्त मानव कल्याणासाठी प्रार्थना करणाऱ्या जैन मुनिंची हत्या म्हणजे आपण भारत देशातच जगत आहोत, का? याचा संशय येत आहे या हत्ये प्रकरणी कर्नाटक शासनाकडून सीबीआय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आचार्य श्री १०८ कुलरत्नभूषण महाराजांनी केली.
बोरगाव येथे दिगंबर जैन समाजाच्या वतीने हिरेकुडी येथील १०८ मुनीश्री कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येचा मंगळवारी करण्यात आला. याशिवाय बोरगाव बंदीची हाक देण्यात आली होती. या बंदला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समस्त दिगंबर जैन समाजाबरोबरच इतर सर्वच समाजातील नागरिक एकत्र येऊन संपूर्ण शहरातून मूक मोर्चा काढून दोषीवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी केली.
कर्नाटक जैन असोसिएशनचे संचालक उत्तम पाटील यांनी, मुनी हत्या प्रकरण कर्नाटक शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून दोषींवर कारवाई व्हावी, असा आदेश तातडीने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिल्याने सर्वच पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. गृह मंत्रालयाकडूनही विशेष सूचना आल्या आहेत. यापुढे जैन तीर्थक्षेत्र व जैन मुनि महाराजांना पोलीस दलाकडून संरक्षण देण्यात येणार असल्याचेही आश्वासन दिले आहे. हत्या प्रकरण सीबीआय चौकशी व्हावी, अशी सर्वांचीच मागणी असून शासन आपल्याला योग्य न्याय देईल असा आपल्याला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब हवले यांनी, राज्यातील अल्पसंख्याकांना सुरक्षा मिळावी, यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मागणी आहे. पण या मागणीची दखल घेत जात नाही. तरी शासनाने यापुढे अल्पसंख्याकांना व आपल्या समाजातील जैन मुनिंना सुरक्षा द्यावी. शहरातील दिगंबर जैन समाजाच्या वतीने या मागणीची निवेदन मुख्याधिका-याद्वारे मुख्यमंत्री व गृहमंत्रालयाकडे पाठवीत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी मुख्याधिकारी नरस रेड्डी यांच्याकडे मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रथम दर्जा सहाय्यक राहुल गुडयीनकर, द्वितीय दर्जा सहाय्यक पोपट कुरळे, पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार, महसूल निरीक्षक संदीप वाइंगडे, नगरसेवक शरद जंगटे, उल्हास निकम, उमेश वास्कर, राजु गजरे, परवेज अफराज, प्रदीप माळी, बी. के. महाजन, बाळू बसन्नावर, पृथ्वीराज पाटील, शिवप्पा माळगे, भाऊसाहेब बंकापुरे, विद्याधर अम्मनावर, अभय करोले, सुभाष शेट्टी, तुळशीदास वसवाडे, जावेद मकानदार, राजु मगदूम, अजित, तेरदाळे, संगप्पा ऐदमाळे, मनोज पाटील, अशोक पाटील, शोभा हवले, सुरेखा घाळे, यांच्यासह सर्वच समाजातील नागरिक उपस्थित होते.
——————————————————————
दिवसभर बोरगाव बंद
मुनींच्या हत्त्येच्या निषेधार्थ मंगळवारी बंद पुकारण्यात आल्यामुळे शहरातील सर्वच व्यापारी, शाळा, महाविद्यालय, सहकारी संघ, संस्थांनी एकदिवशीय बंद पाळून आपला पाठिंबा दिला. शहरात अनुचित प्रकार घडू नये, म्हणून तीन राखीव पोलीस दलाच्या तुकड्यासह पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Belgaum Varta Belgaum Varta