प्रा. डॉ. किशोर गुरव; अक्कोळ मराठी शाळेत संगणक खोलीचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : जीवनात यशस्वी होण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण आहे. शिक्षणामुळेच जीवन सफल आणि उज्वल बनते. विद्यार्थ्यांनी अपेक्षित ध्येय डोळ्यासमोर ठेवून शिक्षण घ्यावे. शिक्षणामुळेच समाजाचा आणि देशाचा विकास घडून येतो. विद्यार्थ्यांच्या प्रगतीत शिक्षकांसह पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन प्रा. डॉ. किशोर गुरव यांनी केले.
अक्कोळ येथील मराठी शाळेत संगणक खोलीचे उद्घाटन, सत्कार समारंभ व व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष राजेंद्र बामणे उपस्थित होते.
प्रा. डॉ. गुरव म्हणाले, शाळांची प्रगती एसडीएमसी पदाधिकारी आणि पालकांच्या सहकार्यातून होत असते. सरकारी शाळांमधून मिळणारे शिक्षण हे दर्जेदार आणि गुणात्मक असते. पण सध्या पालकांचा दृष्टिकोन बदलत असून इंग्रजीचे फॅड उदयास आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कौशल्याच्या विकासासाठी सरकारी शाळांमध्ये अनेक गुणात्मक उपक्रम राबविण्यात येतात. शिक्षकांनी मूल्याधिष्ठित शिक्षणावर भर द्यावा. विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय डोळ्यासमोर ठेवून अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते.
राजेंद्र बामणे यांनीही मनोगतातून शाळेच्या प्रगतीसाठी पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
प्रारंभी मुख्याध्यापिका एम. के. कोळी यांनी स्वागत केले. वाय. बी. खापरे यांनी परिचय करून गेला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि संगणक खोलीचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांचा सत्कार समारंभही पार पडला.
कार्यक्रमास माजी एसडीएमसी अध्यक्ष दादासो भोई, ग्रामपंचायत उपाध्यक्ष संपत स्वामी, एसडीएमसी उपाध्यक्षा कोमल मोहिते, सदस्य मारुती जाधव, सुरज चव्हाण, विजय मोरे, भानाराम परमार, मीनाक्षी सोळंपुरे, कल्याणी भोपळे, उमा कुरळूपे, प्रतिभा वाडकर, श्रीदेवी वाडकर, अर्चना वड्डर, अनिल कोळी, चेतन पाटील, बी. आर. कांबळे, आर. आर. कांबळे यांच्यासह एसडीएमसी सदस्य, शिक्षक, मान्यवर, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. आर. वाय. परिट यांनी सूत्रसंचालन केले तर ए. ए. वंजारे यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta