Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणीत प्लास्टिक विरोधात कारवाई सुरू

Spread the love

 

पहिल्याच दिवशी १८ किलो प्लास्टिक जप्त; निरंतर होणार कारवाई
निपाणी (वार्ता) : सिंगल वापर प्लास्टिक वर प्रशासनाने पाच वर्षांपूर्वी बंदी घातली आहे. तरीही चोरट्या पद्धतीने निपाणी शहर व परिसरात निरंतरपणे प्लास्टिक वापर होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार येथील नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी यांच्या सूचनेनुसार मंगळवारपासून (ता. ११) शहरात प्लास्टिक वापरणाऱ्या वर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी नगरपालिकेच्या पथकाने विविध ठिकाणी धाडी टाकून १८ किलो ४०० ग्रॅम प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या आहेत. संबंध दुकानाकडून १४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे प्लास्टिक विक्री करणाऱ्या व्यवसायिकासह वापरणा-या व्यक्तींचे धाबे दणाणले आहे.
याबाबत नगरपालिका प्रशासनाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यापासून प्लास्टिक बंदी विरोधात मोहीम उघडण्यात आली आहे. त्यानुसार निपाणी नगरपालिकेतर्फेही प्लास्टिक कॅरीबॅग वापरणारा विरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहरातील प्लास्टिक पिशव्यांचे विक्रेते व इतर वस्तू विक्री करणाऱ्या व्यवसायिकावर प्लास्टिक बंदी विरोधी पथकाने मंगळवारी अचानक धाडसत्र राबविले. त्यामध्ये २७ ठिकाणी धाड टाकून एकूण १८ किलो ४०० ग्रॅम प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय १४०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नगरपालिकेतर्फे प्लास्टिक बंदी विरोधातील मोहीम महिनाभर चालणार आहे. त्यामुळे यापुढील काळात हातगाडी, फेरीवाले, किराणा दुकान, भांडी दुकान, फळ विक्रेते, हॉटेल व्यवसायिक व इतर व्यवसायाच्या ठिकाणी ही मोहीम राबविली जाणार आहे. दोन वेळा दंडात्मक कारवाई करून तिसऱ्यांदा संबंधित व्यवसायिकांचा परवाना रद्द करण्याची कारवाईही होणार आहे. याशिवाय प्लास्टिक कॅरीबॅग मागणाऱ्या व्यवसायिकावरही कारवाई होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी कागदी अथवा कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. मंगळवारी झालेल्या कारवाई मध्ये अभियंते विनायक जाधव बाळासाहेब खोत, विशाल मधाळे, अमोल भोसले, आकाश वाघेला, सुनील कांबळे, धनाजी कांबळे यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
—————————————————————–
‘पर्यावरण प्रदूषण होत असल्याने प्रशासनाने सिंगल वापराच्या प्लास्टिक वर बंदी घातली आहे. तरीही अनेक जण प्लास्टिकचा वापर करत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार प्लास्टिक बंदीची मोहीम राबविली जात आहे. त्यामुळे व्यवसायिकांनी प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण समतोलासाठी हातभार लावणे आवश्यक आहे. यापुढील काळात ही मोहीम जोरदारपणे राबविली जाणार आहे.’
-जगदीश हुलगेज्जी, नगरपालिका आयुक्त, निपाणी

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांनी न्याय, हक्कासाठी अधिवेशनातील मोर्चात सहभागी व्हावे

Spread the love  राजू पोवार यांचे भावनिक आवाहन : ‘रयत’च्या पदाधिकाऱ्यांची निपाणीच बैठक निपाणी (वार्ता) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *