चार तोळ्याचे दागिने जप्त; आरोपीची कारागृहात रवानगी
निपाणी (वार्ता) : घर रंगवण्यासाठी आलेल्या खुद्द पेंटरनेच घर मालकाच्या घरात असलेल्या तिजोरीतील सुमारे २ लाख रुपये किंमतीचे ४ तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास करून पोबारा केल्याची घटना नजीकच्या लखनापूर येथे गुरुवारी उघडकीस आली. दरम्यान अवघ्या बारा तासात बसवेश्वर चौक पोलिसांनी संशयित पेंटरला मुद्देमालासह गजाआड केले. कुमार रावसाहेब कोळी (वय २६ रा. ममदापूर के. एल. ता.निपाणी) असे अटक केलेल्या संशयित चोरटयाचे नाव आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, ममदापूर के.एल. येथील पेंटर कुमार कोळी हे गेल्या अनेक वर्षापासून पेंटर काम करतात. दरम्यान त्यांनी लखनापूर येथील मलमोडा रामचंद्र कोरे यांच्या घराच्या रंगकामाचे काम हाती घेतले होते. त्यानुसार ते बुधवारी कोरे यांच्या घराचे रंगकाम करीत असताना कोरे यांच्या घरातील मंडळी पेंटर कुमार याच्यावर विश्वास ठेवून काही कामानिमित्त बाहेर गेल्याचे पाहून कुमार कोळी यांनी घरात असलेली तिजोरी उघडून त्यामधील असलेले तीन तोळ्याची चेन व एक तोळ्याच्या दोन अंगठ्या असा एकूण चार तोळ्याचा सोन्याचा ऐवज लांबवुन सायंकाळी तो आपल्या मूळगावी परतला.
दरम्यान ही घटना कोरे यांच्या लक्षात आल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घराचे रंगकाम चालू असल्याने पोलिसांना संशय आला. त्यानुसार मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली. त्यानुसार उपनिरीक्षक रमेश पवार यांच्यासह सहाय्यक उपनिरीक्षक उपनिरीक्षक अर्जुन कुंभार, हवालदार मारुती कांबळे, श्रीशैल मळळी, रामगोंडा पाटील, एम. ए. तेरदाळ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी शिताफीने घराचे रंगकाम आटोपून घरी गेलेल्या कुमार कोळी याला रात्री उशिरा ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपण चोरी केल्याची कबुली दिली.
त्यानुसार या घटनेचा तपास अवघ्या बारा तासात लावीत संशयीत चोरट्याला पकडल्याने बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी अभिनंदन केले.
घर रंगवण्यासाठी आलेल्या पेंटरकडून चोरीचा प्रकार उघडकीस आल्याने घटनास्थळी नागरीकांनी मोठी गर्दी झाली होती. दरम्यान कोरे यांच्या फिर्यादीनुसार कुमार याला पोलिसांनी अटक करून त्याला निपाणी न्यायालयासमोर हजर केले असता त्याची बेळगावच्या हिंडलगा जेलमध्ये रवानगी केल्याची माहिती उपनिरीक्षक पवार यांनी दिली.
Belgaum Varta Belgaum Varta