लक्ष्मण चिंगळे : घटप्रभा येथे सेवा दल प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ
निपाणी (वार्ता) : डॉ. एन. एस. हर्डीकर यांनी सेवा दलाची स्थापना करून भारतीयांमध्ये देशप्रेम जागृत करण्याचे काम केले. समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सहभाग घेतला. सेवा दलाच्या खेडेपाडी शाखा स्थापन करून काँग्रेसच्या मजबुतीसाठी योगदान दिले. त्यांचाच आदर्श आजच्या पिढीने घ्यावा यासाठी सेवा दलाच्या माध्यमातून प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जात आहेत. देशाला मिळालेले स्वातंत्र्य आणि घटना अबाधित ठेवण्यासाठी सेवा दल कार्यरत आहे, असे मत चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांनी व्यक्त केले.
घटप्रभा येथे डॉ. एन. एस. हर्डीकर सेवा दल प्रशिक्षण केंद्रात देशभरातील सेवा दल कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रीय काँग्रेस सेवा दल प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ झाला. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कर्नाटक राज्य सेवा दलाचे मुख्य संघटक एम. रामचंद्रप्पा हे होते. १५ ते २४ जुलै असे दहा दिवस हे निवासी शिबिर पार पडणार आहे. शिबिराचे उद्घाटन डॉ. स्वाती वैद्य व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
चिंगळे म्हणाले, डॉ. एन. एस. हर्डीकर यांची कर्मभूमी घटप्रभा असल्याने या ठिकाणी त्यांची समाधी आहे. तसेच येथील सेवा दल केंद्राचे पुनरुज्जीवन करण्यात डॉ. घनश्याम वैद्य कुटुंबीय, विधान परिषद सदस्य बी.के. हरिप्रसाद तसेच पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे मोठे योगदान आहे. देशामध्ये काँग्रेस मजबूत करण्यासाठी अशा सेवादल शिबिरांची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे सांगितले.
यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी राहुल गांधी यांच्यासोबत सुरुवातीपासून शेवटपर्यंत भारत जोडो यात्रेत सहभागी झालेले देवेंद्र शर्मा, जाफर बाबू, पी. व्ही. वेणुगोपाल, जुनेद यांचा सत्कार करण्यात आला. सदर शिबिराचे नेतृत्व राष्ट्रीय सेवा दलाचे सचिव बलरामसिंह बडोरिया हे करत आहेत. या शिबिरात कर्नाटक सेवा दलाचे कार्याध्यक्ष ॲड. व्ही. व्ही. तुळशीगिरी, महाराष्ट्र सेवा दलाचे प्रमुख विनोद कोळपकर, तेलंगणाचे प्रमुख सुब्रमण्यम, तामिळनाडू प्रमुख कुंगफू विजयन, हिमाचल प्रदेश प्रमुख अनुराग शर्मा, केरळ प्रमुख ए. पी. रविचंद्रन, मध्यप्रदेश सेवादल प्रमुख देवेंद्र शर्मा, प्रशिक्षण केंद्राचे बी. एन. शिंदे, बेळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्यासह सुमारे १७ राज्यातील २६० प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta