लसीकरण करणे गरजेचे : अनेक जनावरे आजारी
कोगनोळी : कुर्ली तालुका निपाणी येथील लाळखुराक आजाराने तीन जनावरे दगावली आहेत. यामुळे शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना काळात शेतकर्यांना आर्थिक फटका बसला आहे.
निपाणी तालुक्यामध्ये पशुवैद्यकीय दवाखानाच्या वतीने लाळखुराक लस दोन महिन्यापूर्वीच देण्यात यायला पाहिजे होती. पण शासनाकडे लस उपलब्ध नसल्याकारणाने लसीकरण झाले नाही. याचा फटका निपाणी तालुक्यातील जनावरांना बसला आहे. कुर्ली येथील दिनकर पवार यांची म्हैस अंदाजे किंमत 80 हजार, राहुल सातापा पवार यांची गाय अंदाजे किंमत 60 हजार, रंगराव दत्तू ढोणे यांची गाय अंदाजे किंमत 55 हजार लाळ खुराक आजाराने दगावले आहेत तर गावांमध्ये शेकडो जनावरे या आजाराने त्रस्त आहेत. येथील दूध उत्पादक शेतकर्यांनी जनावरांचा विमा न केल्याने त्यांना मोठा फटका बसला आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर निपाणी तालुक्यामध्ये लस उपलब्ध करून जनावरांना देण्यात यावी यासाठी लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांच्या कडून करण्यात येत आहे.
——–
येणार्या 10 तारखेपर्यंत लाळखुराक लस उपलब्ध होणार आहे. कर्मचार्यांची टीम तयार आहे. लस येताच जलदगतीने लस देण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
– डॉ. जे. एम. कंकणवाडे, निपाणी पशुवैद्यकीय अधिकारी.
—–
परिसरातील जनावरांना लाळ येऊन आजारी आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले आहेत. लस उपलब्ध होतास लसीकरण करण्यात येणार आहे.
– डॉ. के. टी. सूर्यवंशी.
—–
दोन महिन्यापूर्वीच लसीकरण व्हायला पाहिजे होते. लसीकरण न झाल्याने अनेक जनावरे आजारी असून जनावरांचा मृत्यू होत आहे. यामुळे शेतकर्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत मिळावी. शासनाने लस उपलब्ध करून देऊन लसीकरण ताबडतोब करावे.
– श्री. लक्ष्मण नेजे, सामाजिक कार्यकर्ते कुर्ली.
